Pune : शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी करणार

एमपीसी न्यूज – शहराच्या हद्दीतील सर्व अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगच्या तपासणीचे काम पालिकेकडून लवकरच हातात घेण्यात येणार असून, 2003 च्या नियमावलीनुसार होर्डिंगला परवानग्या देण्यात आल्या आहेत आणि नियमांचे पालन करण्यात आले आहे का, याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.

शाहीर अमर शेख चौकात लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातामध्ये चार निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी करण्यात येणार आहे.

याविषयी निंबाळकर म्हणाले, पुणे महापालिकेची होर्डिंग  संदर्भात 2003ची नियमावली आहे. यानुसार शहरामध्ये होर्डिंगला परवानगी देण्यात येते. परवानगी देत असताना नियमांचे पालन करण्यात आले आहे . सध्या होर्डिंग्स व्यवस्थित आहेत का याची तपासणी पालिका प्रशासनाकडून करण्यात येते.  पुणे शहरामध्ये रेल्वे प्रशासनाची 46 होर्डिंग्स आहेत. रेल्वे प्रशासन महापालिकेच्या नियमांचे पालन करीत नाही, रेल्वे प्रशासनाकडून होर्डिंग्स परवानगी देत असताना, कोणत्या  नियमावलीचे पालन करण्यात येत नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे.

महापालिकेच्या हद्दीमध्ये रेल्वेचे होर्डिंग असले, तरी महापालिकेला यासंदर्भात माहिती कळवणे आणि महापालिकेची नियमावली लागू करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासन ज्या निकालाच्या आधारे महापालिकेचा अधिकार नाही, असे वारंवार सांगत आहे, याची माहिती घेण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महापालिका प्रशासन आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक ठेवण्यात आली. या वैठकीमध्ये सर्व मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या हद्दीमध्ये 46 होर्डिंगची स्थिती काय आहे? यापासून धोका आहे का ? याची माहिती घेण्यात येईल. पालिका प्रशासन आणि  रेल्वे यांच्याकडे असलेल्या माहितीवरून जबाबदारी निश्चित होईल, रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय आहे? सर्व गोष्टी रेकॉर्डवर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, रेल्वेच्या हद्दतील होर्डिंग्स ची जबाबदारी या बैठकीमध्ये निश्चित केली जाईल, असे निंबाळकर म्हणाले,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.