_MPC_DIR_MPU_III

IPL 2020 : बंगळुरूचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, चेन्नईचा पाचवा पराभव

एमपीसी न्यूज – विराट सेनेच्या बंगळुरू संघाने चेन्नईवर 37 धावांनी विजय मिळवला आहे. धोनीच्या चेन्नई संघाचा हा हंगामातील पाचवा पराभव असून त्यांनी आतापर्यंत फक्त दोनच सामने जिंकले आहेत. दुसरीकडे विराट सेना तुफान चालली असून त्यांचा हा चौथा विजय आहे.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुरवातीला फलंदाजी करताना चार बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. विजयासाठी 170 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा डाव वीस षटकात आठ बाद 132 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नई कडून अंबाती रायडू याने सर्वाधिक 42 आणि जगदिशन यांनी 33 धावा केल्या.

याव्यतिरिक्त चेन्नई कडून कोणीही दमदार खेळी करु शकले नाही. बंगळुरूच्या क्रिस माॅरिस याने तीन, वॉशिंग्टन सुंदर याने दोन तर, उडाना व चहल याने 1-1 गडी बाद केला.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर आरोन फिंच अवघ्या दोन धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर देवदत्त पडीकल आणि विराटने डाव सावरला. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली.

पडीकल 33 धावांवर बाद झाला पाठोपाठ एबी डीव्हिलियर्स सुद्धा शून्यावर बाद झाला. फलंदाजीत बढती मिळालेला वॉशिंग्टन सुंदर केवळ दहा धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शिवम दुबे या जोडी डाव संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला.

विराटने 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 चेंडूत नाबाद 90 धावा कुटल्या. शिवम दुबेनेही 14 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार खेचला.

दोघांनी केलेल्या 76 धावांच्या भागीदारीच्या बळावरच बंगळुरूने चार बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने 2, सॅम करनने 1 आणि दीपक चहरने 1 बळी घेतला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.