IPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय

एमपीसी न्यूज – आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील नववा सामना शारजाच्या मैदानात खेळवण्यात आला. किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर 223 धावा केल्या. सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्स संघाने हे चार गडी राखून पंजाबवर ऐतिहासिक विजय मिळवला. 

पंजाबने राजस्थानला विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.

मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या 18 व्या षटकात तेवतियाने 5 षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं.

31चेंडूत 7षटकार खेचत तेवतियाने 53 धावा केल्या. अखेरच्या षटकांत शमीने तेवतियाला तर मुरगन आश्विनने रियान परागला माघारी धाडत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू टॉम करनने चौकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. किंग्ज इलेव्हन कडून शमी ने 3 तर काॅट्रेल, अश्र्विन आणि नीशम यांनी 1-1-1 विकेट घेतली.

त्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किंग्ज इलेव्हनच्या सलामी जोडीने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली. मयांक 106 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर राहुलही तंबूत परतला. त्याने 69 धावा केल्या. मॅक्सवेलनं 9 चेंडूत केलेल्या 13 धावा आणि पूरनच्या 8 चेंडूतील 25 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने निर्धारित 20 षटकात 2 बाद 223 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स कडून करण आणि रजपूत याने 1-1 विकेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.