IPL 2021: कमी स्कोअरच्या रंगतदार सामन्यात दिल्ली ठरली मुंबई संघावर वरचढ!

मुंबई इंडियन्सचा पराभव त्यांना 'प्ले ऑफ' मधील स्थान पक्के करण्यात आला आडवा

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – शारजाच्या मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात दिल्ली संघाने उत्तम टेम्परामेन्ट दाखवत कठीण परिस्थितीत धीरोदात्त खेळ करून मुंबई संघावर चार गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला, तर मुंबईच्या ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याच्या शक्यता आणखी कमी झाल्या आहेत.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स मधील आजच्या सामन्यात दिल्लीपेक्षा विजयाची गरज मुंबई इंडियन्सला जास्त होती. या दोन संघांमध्ये दिल्लीने ‘प्ले ऑफ’ मधील आपले स्थान आधीच पक्के केलेले आहे, तर पाच वेळा ही स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्स या वर्षी मात्र आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करू शकली नाही.

आज तरी रोहीत आणि कंपनी विजयी पताका झळकावतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. क्रिकेट हा खेळच असा आहे की, ज्यामध्ये काल काय केले, याला काहीही महत्त्व नसते. आज तुम्ही कसे खेळता आणि कसा विजय मिळवता यावरच सर्व अवलंबून असते. त्यामुळेच पाच वेळेस आयपीएलचा झळाळता कप उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सला या वर्षी अजून तरी ‘प्ले ऑफ’ मधील आपले स्थान पक्के करता आले नसल्याने आज त्यांना विजय मिळवणे क्रमप्राप्तच होते.

दिल्लीचा युवा शिलेदार ऋषभ पंतने आकस्मिकरित्या मिळालेले कर्णधारपद खूप उत्तमरित्या निभावून सर्वांना प्रभावीत केलेले आहे. आजही त्याने शारजाच्या खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून डीकॉक आणि रोहितने सलामी साठी सुरुवात केली, पण अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा केवळ आठ धावा करून सामन्याच्या दुसऱ्याच षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्याच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादववर मागील काही सामन्यात वारंवार अपयशी ठरल्याने प्रचंड दडपण होते, पण आज त्याने ते सर्व विसरून आपला दर्जा दाखवणार खेळ केला. अश्विनला त्याने एकाच षटकात मारलेले फटके त्याचा दर्जा सिद्ध करणारेच होते. डीकॉक सुद्धा दुसऱ्या बाजूने चांगले खेळत होता, मात्र अक्षर पटेल गोलंदाजीला येताच त्याचा संयम हरवला आणि तो नोर्जेच्या हातात झेल देऊन वैयक्तिक 19 धावांवर बाद झाला.

मुंबईची अवस्था दोन गडी बाद 37 अशी झाली होती, यानंतर आलेल्या सौरभ तिवारीने सूर्यकुमार यादवला चांगली साथ देत धावफलक हालता ठेवला खरा, पण अक्षर पटेलने पुन्हा एकदा मुंबईला हादरा देताना सुर्यकुमारच्या खेळीचा अस्त केला. त्याने 26 चेंडूत 33 धावा करताना दोन चौकार आणि तेव्हढेच षटकार मारले,त्पाठोपाठ सौरभ तिवारीला सुद्धा अक्षरने तंबूत पाठवून आ सामन्यातला आपली तिसरी विकेट प्राप्त केली. त्याच्या जागी आलेल्या पोलार्डने आजही निराश करत लवकरच तंबूचा रस्ता धरून संघाला आणखीच अडचणीत आणले.

खेळपट्टी एकदम गोलंदाजीसाठी धार्जिणी झाली होती. आयपीएल किंवा 20/20 मध्ये निर्धाव चेंडू फार अशक्य, पण या दडपणाखाली मुंबई इंडियन्सच्या डावात तब्बल दहा चेंडू निर्धाव गेले आणि दोन षटकात केवळ एकच धाव निघाली यावरून तुम्हाला अंदाज येईल आणि यावेळी खेळपट्टीवर कोण होते तर ते पंड्या बंधू, पण आज ना ते चालले ना त्यांचा दरारा!

एकवेळ तर मुंबई इंडियन्स 100 तरी करेल का, अशी काळजी वाटत असतानाच जयंत यादवने साहसी फलंदाजी करत कृणाल पंड्याच्या साथीने संघाला कसेबसे सव्वाशेच्या पुढे नेले. अखेरीस 20 षटकानंतर मुंबईच्या 129 धावा झाल्या होत्या. ज्या या खेळपट्टीवर अगदीच कमीही नव्हत्या. त्यामुळे आता बुमराह आणि कंपनी काय करते यावर मुंबईचा विजय की पराभव हे कळणार होते. दिल्लीकडून अक्षर पटेल व आवेश खानने सुंदर गोलंदाजी करत प्रत्येकी तीन-तीन बळी घेत मुंबईचा डाव एवढ्या कमी धावसंख्येत रोखण्यात मोलाची कामगिरी केली.

अर्थात अशा घातक खेळपट्टीवर पाठलाग करताना खास करून जेव्हा असे कमी धावसंख्या असणारे सामने होतात, तेव्हा विजयाची शक्यता समसमान असते. त्यातच मुंबई इंडियन्सकडे तिखट गोलंदाज आहेत, याचेच प्रत्यंतर दिल्लीच्या संघाला डावाच्या सुरुवातीलाच आले. फक्त पहिली विकेट ही धावबादच्या रुपात आली. धवन जो यावर्षीच्या आयपीएलमध्ये तुफानी फॉर्मात आहे, तो आज केवळ आठ धावा काढून पोलार्डच्या हातून धावबाद झाला. तेव्हा दिल्ली संघाच्या केवळ 14 धावा झाल्या होत्या यात एकाच धावेची भर पडली असताना पृथ्वी शॉ कृनालच्या स्लोवनवर पायचीत झाला. त्याने फक्त सात धावा काढल्या.

त्यानंतर कर्णधार पंत आणि स्टिव्ह स्मिथने संघाला सावरत खेळ सुरू ठेवला, पण 30 धावा झालेल्या असताना स्मिथ सुद्धा कुलटननाईलच्या चेंडूवर केवळ 9 धावा काढून त्रिफळाबाद झाला आणि दिल्ली संघांची अवस्था तीन गडी बाद 30 अशी बिकट झाली. दुःखात सुख एवढेच होते की मैदानावर किल्ला लढवायला ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोन खंदे शिलेदार तयार होते.

दोघेही युवा शिलेदार जबरदस्त ताकतीचे आहेत, प्रतिभावंत आहेत, हे याआधी वारंवार सिद्ध झालेले आहेच, फक्त आधी म्हणालो त्यानुसार क्रिकेटमध्ये कालच्या कामगिरीपेक्षा आजच्या कामगिरीला जास्त मोल असते. पंतकडे प्रतिभा,ताकत आक्रमकता आदी भरभरून असले तरी संयम कमी आहे याआधीही हे सिद्ध झालेले आहेच. आजही त्याचाच प्रत्यय आला. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी ओळखून डाव सावरला आहे, असे वाटत असतानाच तो 22 चेंडूत 26 आक्रमक धावा काढून जयंत यादवच्या गोलंदाजीवर  हार्दिक पंड्याच्या हातात झेल देऊन बाद झाला.

आठ षटकात दिल्लीचे चार गडी बाद  झाले होते आणि त्याबदल्यात केवळ 57 धावा झाल्या होत्या. उरलेल्या 72 चेंडूत 73 धावा होत्या, एरव्ही षटकामागे सहा धावा 20/20 त फारच मामुली पण अशा खेळपट्टीवर या धावा एव्हरेस्ट शिखराइतक्या दूरच्या दिसतात. त्यात मुंबईकडे एकसे बढकर एक खतरनाक गोलंदाज, त्यामुळे सामना नक्कीच उत्कंठावर्धक होईल, याची आशा नाही तर खात्रीच क्रिकेट रसिकांना होती.

आणखी 20 धावा वाढल्या असताना अक्षर पटेल पाचव्या गड्याच्या रुपात बाद झाल्याने मुंबईच्या आशा पल्लवीत झाल्याच होत्या, पण त्यानंतर आलेल्या सिमरन हेटमायरने कॅरेबियन अंदाजात खेळत 8च चेंडूत 15 धावा करताना विजयाचे पारडे पुन्हा दिल्लीकडे झुकवले, असे वाटत असतानाच बुम बुम बुमराहने त्याला एका स्लो चेंडूवर चकवत पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण केली.

शेवटच्या 30 चेंडूत 30 धावा आणि हातात केवळ चार बळी अशी दिल्लीची परिस्थिती असली तरी एक बाजू मजबूत होती, ती म्हणजे एवढ्या पडझडीतही श्रेयस विजयाचे श्रेय घेण्यासाठी ठाम उभा होता. त्याने अतिशय शांत डोक्याने फलंदाजी करत संघाला निराश केले नाही, अश्विनने त्याला योग्य साथ देत महत्वपूर्ण 20 नाबाद धावा केल्या तर श्रेयसने 33 चेंडूत नाबाद 33 धावा करताना केवळ 2 चौकार मारले. दिल्लीचा अक्षर पटेल सामनावीर ठरला.

दिल्ली संघ यासामन्याआधीच प्ले ऑफ मध्ये गेल्याने त्यांना या सामन्याच्या निकालाची काळजी नसली तरी त्यांनी आणखी एक विजय मिळवणे जास्त योग्य मानले. मुंबईचा मात्र या पराभवाने प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता गढूळ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.