IPL 2023-मुंबई इंडियन्सने सहा गडी राखून आरसीबीवर मिळविला विजय

एमपीएससी न्यूज (विवेक कुलकर्णी) : अडखळत सुरुवात करणाऱ्या (IPL 2023) मुंबई इंडियन्सला जसजशी स्पर्धा पुढे पुढे जात राहते तसतसा त्यांना सूर सापडत जातो, या  अजिबोगरिब समजाला खरे ठरवत आज मुंबई इंडियन्सने महत्वाच्या सामन्यात महत्वपूर्ण विजय मिळवताना आरसीबीला 21 चेंडू आणि सहा गडी राखून पराभूत करत अंकतालिकेत आपले स्थानही थेट तिसऱ्या क्रमांकावर विराजमान करत इतर संघासाठी धोक्याचा इशाराही दिलेला आहे.

प्ले ऑफ साठी आपली जागा मजबूत करण्यासाठी दोन्हीही संघाला विजय अत्यावश्यक असल्याने हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा असलेल्या प्रेक्षकांना या सामन्याने जराही निराश केले नाही, अन सूर्यकुमार यादवच्या एका अविस्मरणीय खेळीने(IPL 2023) विजयाची अनोखी मेजवानीही दिली.जबरदस्त खेळी करणाऱ्या सुर्यकुमार यादवला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
मुंबई आणि आरसीबी या दोन बलाढ्य संघातील आयपीएल 2023 मधला आजचा 54 वा साखळी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिवसरात्र असा खेळवला गेला .ज्यात मुंबई संघाचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला आज तरी आपल्या संघासाठी विराट खेळी करता आली नाही आणि तो सामन्याच्या पहिल्याच षटकातल्या 5 व्या चेंडूवर बेहरनडोफच्या गोलंदाजीवर ईशान किशनच्या हातात झेल देवून तंबूत परतला. त्याने फक्त 1 धाव  काढली. त्यानंतर डूप्लेसीला साथ द्यायला मैदानावर आला तो  युवा अनुज रावत,पण त्यालाही बेहरनडॉफने ग्रीनच्या हातून झेलबाद करत आरसीबीची अवस्था दोन बाद 16 अशी बिकट केली.

यावेळेस आरसीबी कठीण परिस्थितीत आहे असे वाटायला लागले होते, याचवेळी एकत्र आले ते कर्णधार फाफ डूप्लेसी आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल. या जोडीने मुंबईच्या गोलंदांजावर तुफानी हल्ला चढवत संघाला कठीण परिस्थितीतून मजबूत स्थितीत आणून ठेवले. दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धशतके पूर्ण करताना संघासाठी तिसऱ्या गड्यासाठी 120 धावांची मजबूत भागीदारी करत मुंबई गोलंदाजांचे चांगलेच घामटे काढले. ही जोडी रोहितची डोकेदुखी वाढवत आहे असे वाटत असतानाच बेहरनडॉफ पुन्हा एकदा रोहितच्या हाकेला धावून आला आणि त्याने मॅक्सवेलची मॅक्सिमम वेल खेळी समाप्त करुन संघाला मोठे यश मिळवून दिले.

मॅक्सवेलने केवळ 33 चेंडूत 8 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारत 68 धावा ठोकल्या, तो बाद झाला अन त्याच्या पाठोपाठ महिपाल लोमरारही केवळ एक धाव करून कुमार कार्तिकेयच्या गोलंदाजीवर बाद झाला अन आरसीबीची अवस्था चौदाव्या षटकात 4 बाद 143 अशी झाली होती, अन हे कमी की काय असे वाटावे असे झाले जेव्हा जम बसलेला डूप्लेसीही ग्रीनच्या गोलंदाजीवर 65 धावा करुन तंबूत परतला.

त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत या धावा ठोकल्या, यावेळी (IPL 2023) आरसीबीचा अर्धा2 संघ तंबूत परतला होता अन धावफलकावर त्यांच्या 14.1 षटकात5 बाद 146 धावाच दिसत होत्या,यावेळी मुंबई संघ वरचढ आहे असे वाटत असतानाच आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबईच्या कमकुवत गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि उरलेल्या 35 चेंडूत 54 धावा चोपत संघाला 199 धावांची चांगली अन सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली(IPL2023). दिनेश कार्तिक,केदार जाधव आणि हसरंगा यांनी बॅट फिरवत संघाला या स्थितीत आणून ठेवण्यात मोठा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सला अखेरचा घाव घालण्यात येत असलेले अपयश आजही तसेच कायम राहिले ज्याचा अचूक फायदा उठवून आरसीबीने एक मजबूत धावसंख्या उभारली.

मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ मधले आपले स्थान पक्के करण्यासाठी 120 चेंडूत 200 धावा करायच्या होत्या,ज्यासाठी त्यांची सुरुवात ठोस व्हायला हवी होती. ईशान किशन आणि कर्णधार रोहितने तशी सुरुवात करून दिलीच आहे असे वाटत असतानाच वारेंदू हसरंगाने एकाच षटकात खतरनाक अंदाजात खेळत असलेल्या ईशानला आणि धावा करण्यासाठी झगडत असलेल्या रोहितला बाद करून मुंबईच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.किशनने 21 चेंडूत 4चौकार आणि तितकेच षटकार मारत 42 धावा केल्या तर रोहितने 8 चेंडूत 7 धावा काढल्या.क्रिकेट हा खेळ जितका सुंदर आहे तितकाच तो निष्ठूर आहे असे म्हटले जाते ते पटते हे प्रत्यक्ष अनुभवताना.

Today’s Horoscope 10 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

लताबाईचा स्वर्गीय आवाज,मधुबालाचे आरसपाणी सौंदर्य जितके सुंदर तितकीच भरात असलेल्या रोहितची फलंदाजीही एखाद्या महान कलाकाराच्या कलाविष्कारासारखी असते,त्याच रोहितला एकेक धाव करण्यासाठी झगडत असलेले बघताना मनाला होणारे दुःख खरेचच शब्दात मांडणे अशक्य, हे अतिक्रिकेटमुळे होतेय का की याला रोहितचा कॅज्युअल एटीट्युड कारणीभूत आहे कोण जाणे,पण रोहितला लवकरच त्याचा फॉर्म परत मिळणे हे भारतीय संघासाठी फार गरजेचे आहे,हे नक्की.रोहीत बाद झाला तेंव्हा मुंबईच्या 5 षटकात दोन बाद 52 धावा झाल्या होत्या ,आरसीबीच्या गोटात आनंदी वातावरण असले तरीही मुंबई इंडियन्सच्या गटात काळजी करण्यासारखे काहीही नव्हते कारण अजून मिस्टर 360 ची फलंदाजी शाबूत होती, अन तो मैदानावर असेपर्यंत कितीही मोठे आव्हान आव्हान वाटत नसते.

खरेतर काहीच काळापूर्वी या सुर्याला ग्रहण लागले होते, गोल्डन डक  आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कोणालाही नकोसे (IPL 2023) असते तेच या सूर्याने काही महिन्यांपूर्वी भोगले होते,अनुभवलेही होते,पण मोठे खेळाडू अशा छोट्या मोठया अपयशाने खचत नसतात,हेच सिद्ध करणारा खेळ सुर्या या आयपीएल मध्ये करून दाखवत आहे,आजही त्याने आपल्याला या फॉरमॅट मधले सर्वात मोठे अस्त्र का म्हणतात हे सोदाहरण सिद्ध करून दाखवताना जबरदस्त खेळी करत संघाला निराशेच्या गर्तेतून आशेचा किरण दाखवला,त्याला उत्तम साथ दिली ती युवा नेहुल वदेराने सुद्धा.

बघताबघता सूर्याने या हंगामातले आपले चौथे अर्धशतक पूर्ण करून आपली बॅट उंचावत मुंबईच्या वानखेडेवर उपस्थित असलेल्या असंख्य रसिकांना एक जबरदस्त मेजवानी दिली.अर्धशतक झाल्यानंतर(IPL 2023) तर त्याची बॅट थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या त्या तलवारीसमान अंधाधुंद चालत होती,ज्यात आरसीबीची गोलंदाजी नेस्तनाबूत झाली, सुर्या आपल्या संघाला मोठा आणि अविस्मरणीय विजय मिळवून देईल असे वाटत असताना आणि विजय अगदी हातातोंडाशी आलेला असताना तो एक उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात केदार जाधवच्या हातात झेल देवून 83 धावांवर असताना विजयकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.

तो तंबूत परतत असताना मैदानावर उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांनी उभे राहत टाळ्या वाजवून या एका अविस्मरणीय खेळीला मानवंदना दिली, पुढच्याच चेंडूवर विजयकुमारने खतरनाक टीम डेविडलाही आल्यापावलीच परत पाठवून आरसीबीला आशा दाखवली खरी, पण ती फारच अंधुक होती,पुढच्याच षटकात नेहलने उत्तुंग षटकार मारत आपले दुसरा अर्धशतक पूर्ण करतानाच संघाला सहा गडी आणि 21चेंडू राखत विजय मिळवून देतानाच अंकतालिकेतही थेट तिसऱ्या क्रमांकावरही विराजमान केले,मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्यांदा दोनशे किंवा त्याहून जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत अशी कामगिरी करणारा पहिला संघ हा बहुमानही पटकावला (IPL 2023)आहे.

संक्षिप्त धावफलक

आरसीबी  6 बाद 199
डूप्लेसी 65,मॅक्सवेल 68,कार्तिक 30
बेहरनडॉफ 36/3,ग्रीन 15 /1,कार्तिकेय 35/1
पराभूत विरुद्ध
मुंबई इंडियन्स
16.3 षटकात 4 बाद 200
सुर्या 83,ईशान 42,नेहल नाबाद 53
हसरंगा 53/2,विजयकुमार 37/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.