IPL 2021 : या कारणामुळे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याची आयपीएल स्पर्धेतून माघार

एमपीसी न्यूज : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे. आर.अश्विनचे कुटुंबिय आणि जवळचे नातेवाईक कोरोनाशी लढत आहेत.

त्यामुळे अशा कठीण प्रसंगी कुटुंबासोबत राहणं योग्य असल्याचं म्हणत आर.अश्विन यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विननं त्याच्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळविण्यात आलेल्या काल रात्रीच्या सामन्यात आर.अश्विनचा दिल्लीच्या संघात समावेश होता. या सामन्यात अश्विननं गोलंदाजी देखील केली. सामना झाल्यानंतर अश्विननं रात्री आयपीएलमधून माघार घेत असल्याचं ट्विट केलं आहे. दरम्यान, कुटुंबिय संकटातून बाहेर पडल्यानंतर आयपीएलमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अश्विननं सांगितलं आहे.

अश्विन सध्या चेन्नईमध्येच आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सचे सामने मुंबईच्या वानखेडे मैदानात झाले होते. त्यानंतर चेन्नईमध्ये दिल्लीचा संघ खेळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये दिल्लीच्या पाचही सामन्यांत अश्विन खेळला आहे. रविवारचा हैदराबाद विरुद्धचा सुपर ओव्हरपर्यंत पोहोचलेला सामना दिल्ली कॅपिटल्स संघानं जिंकला. त्यानंतर रात्री उशिरा १ वाजून १५ मिनिटांनी अश्विननं ट्विट करत आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

“उद्यापासून मी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि नातेवाईक कोरोनाशी लढा देत आहेत. अशा कठीण प्रसंगात मी त्यांच्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. सर्व ठीक झाल्यास मी पुन्हा खेळण्यासाठी प्रयत्नशील असेन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स”, असं ट्विट अश्विननं केलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.