IPL 2021 : बातमी आयपीएल ची – चेन्नई सुसाट एक्सप्रेस, हैदराबाद सनरायजर्सला सात गडी राखून चिरडले

 पुणेकर ऋतुराज गायकवाड पुन्हा चमकला

एमपीसी न्यूज : कालच्या सामन्यात सनरायजर्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी घेतली खरी पण सामना जिंकण्यात मात्र त्यांना यश नाहीच आले.

डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्टो ने सलामीला खेळताना अपेक्षित सुरुवात करून दिली नाही आणि जॉनी फक्त सात धावा काढून सॅम करनची शिकार झाला. यानंतर मनीष पांडे कर्णधाराला साथ द्यायला आला आणि त्याने चांगली फलंदाजी करत काही नेत्रदीपक फटके मारत बघताबघता वैयक्तिक अर्धशतक सुद्धा पूर्ण केले.

दुसऱ्या बाजूने वॉर्नर टिकून होता पण त्याच्या फलंदाजीत नेहमीची आक्रमकता नव्हती, म्हणूनच संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि शेवटीशेवटी केदार जाधव बी केन विल्यम्सनच्या फटकेबाजीमुळे सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 171 अशी बऱ्यापैकी धावसंख्या रचली खरी पण चेन्नई संघाच्या मजबूत फलंदाजीपुढे ही धावसंख्या तशी आव्हानात्मक कधीच नव्हती.

त्यातच ऋतुराज गायकवाडला मागील काही सामन्यापासून बऱ्यापैकी लय सापडल्याने त्याचा आत्मविश्वास बळावलेला आहेच. आजही त्याने डूप्लेसी सोबत जबरदस्त सलामी भागीदारी दिली आणि केवळ 44 चेंडूतच तडाखेबंद 12 चौकार मारत त्याने 75 धावा करताना  पहिल्या विकेटसाठी 129 धावांची आश्वासक सलामी दिली. दुसऱ्या बाजूने डूप्लेशीने सुद्धा आणखी एक अर्धशतक नोंदवून आपला फॉर्म उत्तम आहे हेच अधोरेखित केले.

केवळ आठ चेंडूत 18 धावा काढून मोईन अली बाद झाला त्यापाठोपाठ डूप्लेशी सुद्धा. पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातात आलेलाच होता. विजयाची औपचारिकता जडेजा आणि रैनाने पूर्ण करत संघाची विजयी घोडदौड चालूच ठेवताना संघाला सात गडी राखत विजय मिळवून दिला. अर्थात आपला लाडका पुणेकर ऋतुराज गायकवाडच या विजयाचा शिल्पकार ठरल्याने त्यालाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.