Pimpri News : मुलांना योग्य वेळेत संस्कार देणे गरजेचे – डॉ. नीता मोहिते

एमपीसी न्यूज – मुलांना योग्य वयात, योग्य ते संस्कार होणे खूप गरजेचे असते.त्यासाठी मुलांची मने साभांळून पालकांनी मुलांवर संस्कार केले पाहिजेत, असे मत प्रा. डॉ. नीता मोहिते यांनी व्यक्त केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात श्रावण महिन्यातील हळदीकुंकू व बालसंगोपन कार्यशाळेच्या निमित्ताने शाळा समिती अध्यक्षा प्रा.डॉ. नीता मोहिते यांनी मुलांना व माता पालकांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संचालक नितीन बारणे, खिंवसरा पाटील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालविभाग प्रमुख आशा हुले व प्रशालेतील सर्व शिक्षिका आणि प्रशालेतील माता पालक उपस्थित होत्या.

डॉ. मोहिते म्हणाल्या की,शास्त्रज्ञांच्या मतानुसार मुलांचा बौद्धिक व मानसिक विकास हा शून्य ते पाच वर्ष वयापर्यंत होतो.या वयात मुलांना जे चांगले वाईट अनुभव मिळतात त्याचा परिणाम मुलांच्या पूर्ण आयुष्यावर होतो.त्यामुळे आईने याच वयात आपल्या मुलांना योग्य संस्कार व शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांचे “मन सांभाळा”  म्हणजेच मुलांना ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करू द्या.त्यामध्ये मुलांची चूक झाली किंवा काही नुकसान झाले तर त्याला न रागावता समजून सांगा म्हणजे मुलांच्या मनात लहानपणापासूनच भीती निर्माण होणार नाही व ही मुले मोठेपणी धीट बनतील.शून्य ते पाच या वयोगटात मुलांची स्मरणशक्ती जास्त असते.याचा फायदा घेऊन आईने मुलांवर चांगले संस्कार करावेत.यासाठी आईने मुलांना रामायण, महाभारत, संत महापुरुष, शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगाव्यात.विविध स्तोत्र पाठ करून घ्यावीत.त्यामुळे मुलांचे उच्चार शुद्ध होतात, मुलांची  स्मरणशक्ती वाढते. हेच संस्कार मुलांच्या पुढील आयुष्याच्या जडण घडणीत योग्य दिशा देतात.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या संचालिका सुनिता शिंदे यांनी समितीतर्फे राबवण्यात येणाऱ्या स्तोत्र पठण स्पर्धेविषयी माहिती सांगितली.प्रास्ताविक मुख्याध्यापक नटराज जगताप व सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले.आभार आशा हुले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.