Pune News : सीओईपी मैदानावरील जम्बो 15 जानेवारीपासून तात्पुरते बंद !

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावरील जम्बो हॉस्पिटल 15 जानेवारीपासून तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पुणे महाालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमधील यंत्रणा जैसेथे परिस्थितीत ठेवली जाणार आहे. 

सध्या शहरातील कंटेंन्मेट झोनची संख्या शून्यावर आली आहे. तसेच करोना बाधित रुग्णांची संख्या घटत आहे. शासकीय, महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर जम्बो हॉस्पिटल हे तात्पुरते बंद करण्यात येणार असून येथील रुग्णांना बाणेर येथील कोविड केयर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जम्बो हॉस्पिटलमध्ये 1 जानेवारीपासून नवीन रुग्णांना प्रवेश बंद करण्यात आला. सध्यस्थितीत जम्बो हॉस्पिटलमध्ये सुमारे 95 रुग्णांवर उपचार सुरू असून या सर्व रुग्णांना घरी सोडल्यानंतर हे हॉस्पिटल बंद करण्यात येणार आहे.

सध्या ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, बाणेर येथील कोविड सेंटर, पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय आणि ऑटो क्लस्टर करोना रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. यामुळे जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्बो हॉस्पिटलमध्ये मशीन, इतर आरोग्य उपकरणे तशीच राहणार आहे. शासनाचा जो निधी आरोग्य कर्मचारी इतर बाबींवर खर्च होत आहे, कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असताना तात्पुरती उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलवर खर्च का करायचा या हेतूने जम्बो हॉस्पिटल बंद करण्यात येत आहे. जम्बो हॉस्पिटलवर दर महिन्याला चार ते पाच कोटी रुपये खर्च होत आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.