Khed News : खेडच्या विकासासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आवश्यक – खासदार कोल्हे

एमपीसी न्यूज – प्रस्तावित विमानतळ खेड तालुक्याबाहेर गेल्याने इथला विकास खुंटला आहे. त्यामुळे त्याची काही प्रमाणात भरपाई करुन तालुका विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे विरोध करुन संधी दवडली जाता कामा नये. शेतकऱ्यांच्या शंकांचे पूर्ण समाधान करा, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्या.

प्रस्तावित पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भूसंपादन प्रक्रियेचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (दि.12) आढावा घेतला.

शासकीय विश्रामगृहात कोल्हे यांनी मरकळ, होलेवाडी, मांजरेवाडी भागातील प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, महारेलचे सहमहाव्यवस्थापक सुनील हवालदार, उपमहाव्यवस्थापक एस. आर. शिरोळे, महारेलच्या भूसंपादन विभागाचे व्यवस्थापकीय अधिकारी जयंत पिंपळकर, मंदार विचारे, चंद्रकिशोर भोर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, मार्केट कमिटी माजी सभापती नवनाथ होले, विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत कोल्हे यांनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे नुकसान भरपाई दिली जाणार आहे याची माहिती घेतली. तसेच भूसंपादनामुळे किती शेतकरी अल्पभूधारक व भूमीहिन होत आहेत याची संपूर्ण माहिती देण्याच्या सूचना प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिल्या. या माहितीच्या आधारे अल्पभूधारक व भूमिहिन शेतकऱ्यांसाठी काय विशेष प्रयत्न करता येईल याचा अभ्यास करण्याचे डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.