Khel Ratna Awards: रोहित शर्मा, विनेश फोगाट, मनिका बत्रा, एम. थंगवेलू, रानी रामपाल यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार

इशांत शर्मा व दिप्ती शर्माला अर्जुन पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, 27 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, 15 खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.

यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी या पाच खेळाडूंची शिफारस तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत क्रीडापटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला 1998 साली, धोनीला 2007 तर विराटला 2018 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.