Pune news :आर्यन प्रकरण; किरण गोसावी पुणे पोलिसांसमोर करणार आत्मसमर्पण?; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचं स्पष्टीकरण 

एमपीसी न्यूज: आर्यन खान अटक प्रकरणाला आता नवनवीन वळण मिळाले आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या गौप्यस्फोटानंतर अखेर फरार असलेल्या किरण गोसावी  प्रकट झाला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना किरण गोसावीने आपण पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचं सांगितलं आहे.

तसेच त्याने खंडणी घेतल्याचे आरोपही फेटाळून लावले आहे.तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी गोसावीने आमच्याशी संपर्क साधला नसून आमची पथके त्याचा कसून माग घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधून किरण गोसावी याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. किरण गोसावी याने आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं सांगितलं आहे.

गोसावीने वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, आपण महाराष्ट्र पोलिसांना शरण येणार नसून महाराष्ट्राबाहेर शरण येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर एका मागो माग एक आरोपांचे सत्र सुरु केले आहे. तसेच माझ्याविरुद्ध पुण्यात एक जुनी तक्रार आहे. त्याची अचानक चौकशी सुरू करण्यात आली आहे. माझा शोध घेतला जात आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला जेलमध्ये टाकून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असा दावाही गोसावी याने केला.

यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर जाहिरपणे गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. आर्यन खान केसवरुन राजकीय पक्षांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे. दरम्यान फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पथके गोसावीचा शोध घेत असल्याचे सांगितले. तसेच त्याने वृत्तवाहिनिशी कोठून संवाद साधला हे माहित नसल्याचे स्पष्ट केले. तसेच गोसावीचा शोध फरासखाना पोलीस आणी गुन्हे शाखेची पथके घेत आहेत. त्याचा ठाव ठिकाणा शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.