Kothrud : समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या आठ खंडाचे सरसंघचालकांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज : धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर (Kothrud) यांच्यातर्फे श्री समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडाचा प्रकाशन सोहळा येत्या बुधवारी ( 5 जुलै) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी 6 वाजता हा सोहळा होणार आहे. अशी माहिती श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष अनंत चितळे, मंदिराचे विश्वस्त विनय खटावकर आणि पुणे स्थित समर्थ व्यासपीठाचे उपाध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच यावेळी श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष अनंत चितळे, कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे, धुळे स्थित सत्कार्योत्तेजक सभेचे विश्वास नकाणेकर, सचिव सतीश दीक्षित आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

प्रकल्पाविषयी –

श्रीसमर्थांनी 1620 ते 1632 या आपल्या टाकळी येथील तपश्चर्येच्या काळात, नाशिकमधल्या विद्वानांकडून संस्कृतमधील ‘वाल्मीकी रामायणा’ची प्रत मिळवून, आपले आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र स्वहस्ते लिहून काढले. रामायणाच्या सात कांडांच्या संस्कृत श्लोकांची एकंदर 1720 पृष्ठे समर्थानी आपल्या हस्ताक्षरात लिहून काढली.

विसाव्या शतकात समर्थ संप्रदायातील थोर संशोधक, लेखक कै. शंकर श्रीकृष्ण देव यांनी श्रीसमर्थांची ग्रंथ संपदा जतन करण्यासाठी 1935 मध्ये धुळे येथे श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेची स्थापना केली. श्रीसमर्थाची वास्तव्य स्थाने, तसेच त्यांची आणि त्यांच्या शिष्यांच्या अफाट ग्रंथ संपदेची सुमारे चार हजार हस्तलिखिते त्यांनी देशभर फिरून ती जतन केली. यामध्ये ही समर्थाच्या हस्ताक्षरातील ‘वाल्मीकी रामायणा’ची मिळालेली संपूर्ण प्रत (Kothrud) धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सध्या अत्यंत आधुनिक पद्धतीने जतन करण्यात आलेली आहे.

श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्री समर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या मुळ प्रतींचे कांड निहाय संपादन करून मुळतः असलेल्या सात कांडांचे आवृत्तीच्या आठ खंडांमध्ये रूपांतरित करून ते प्रकाशित करण्याचा संकल्प 2010 मध्ये करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे तेरा वर्षांच्या अखंड संशोधन व संपादन प्रकल्पांनंतर बुधवार, 5 जुलै 2023 रोजी या खंडांचे प्रकाशन होणार आहे.

सध्या जगात सुमारे 44 देशांत ‘वाल्मीकी रामायणा’वर विविध विद्यापीठांत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. परंतु या संशोधनासाठी ज्या ‘वाल्मीकी रामायणा’च्या हस्तलिखिताचा आधार घेतला जातो. ती प्रत समर्थाच्या कालखंडानंतरची आहे. या पार्श्वभूमीवर, सुमारे 400 वर्षांपूर्वी समर्थानी एकहाती सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली ही प्रत जगात चालणाऱ्या या संदर्भातील संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक मूळ स्त्रोत ठरणारी आहे. म्हणूनच ही सर्वात जुनी प्रत संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेने 2010 सालापासून वाल्मीकी रामायण संशोधन प्रकल्प सुरू केला होता.

Shirur : समृद्धी महामार्गावरील अपघातात शिरूर येथील शिक्षक कुटुंबाचा दुर्दैवी अंत; मुलासोबतचा फोटो ठरला अखेरचा

या संशोधन ग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात समर्थाच्या हस्ताक्षरातील स्कॅनिंग केलेले पाने, त्यापुढे संस्कृत श्लोक, त्याचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनुवाद, समर्थाच्या लेखन शैलीवरील व्याकरणात्मक प्रबंध, इंग्रजी शब्दांची सूची, प्रभू श्रीरामाच्या सुमारे 200 विशेषणांसह इतर शेकडो शब्दांवर निवडक टिपा यांचा या सर्व ग्रंथात समावेश आहे.

विशेष म्हणजे समर्थानी हस्तलिखित लिहितांना रामायणातील निवडक प्रसंगांवर काढलेल्या अनेक सुबक चित्रांची स्कॅनिंग केलेली पानेही यामध्ये प्रसिद्ध केली गेली आहेत. प्रत्येक कांडानंतर समर्थानी आपली नाम मुद्रा आणि तिथी लिहिलेली असल्याने या प्रतीच्या अस्सलतेबद्दल शंका घेण्यास जागा उरत नाही.

या मागील तेरा वर्षे चाललेल्या संशोधन प्रकल्पासाठी पुणे, मुंबई, सातारा, नागपूर, धुळे, दिल्ली आदी देशभरातील विविध शहरांतील 27 संशोधक, संस्कृत तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ, व्याकरणकार, वैदिक यांनी यासाठी मोठी मेहनत घेतलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.