Pune News: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. ना. स. फरांदे स्मृतिग्रंथाचे मंगळवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज – ‘दीपस्तंभ’  या प्रा. ना. स. फरांदे यांच्यावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (दि. 19 ) दुपारी 4 वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे करण्यात येणार आहे. प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत फरांदे आणि कार्याध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

 

प्रा. फरांदे यांची 1992 आणि 1998 मध्ये विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली होती. 1994 मध्ये विधान परिषदेचे उपसभापती आणि 1998 मध्ये विधान परिषदेचे सभापती पद त्यांनी भूषविले. 1991 ते 1994 या कालावधीत ते प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते. ‘पुक्टो’ या प्राध्यापकांच्या संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते.

 

नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिर परिसर विकास समितीचे अध्यक्ष, शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त, नगर येथे 1981 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. पुणे विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थांवर विविध महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती. शिक्षण, शेती आणि सहकार या क्षेत्रात त्यांचा विशेष अभ्यास होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.