Lonavala : अधिकृत एसटी बसस्थानकावर बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय

एमपीसी न्यूज – मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा कोलमडून पडल्याने आज प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लोणावळा रेल्वे स्थानकावर गाड्या रद्दची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून एसटी बस स्थानकाकडे धाव घेतली. मात्र, स्थानकात बस नसल्याने प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला. हजारो प्रवासी बसस्थानकात गाड्यांची वाट पहात उभे होते.

लोणावळा शहरातील गवळीवाडा ह्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे प्रशस्त बसस्थानक आहे. मात्र, खासगीकरणाच्या नावाखाली शहराच्या बाहेरील वलवण गावात दोन हाॅटेलांना बसचे थांबे दिल्याने अधिकृत बस थांब्यावर बस न येता त्या ह्या खासगी थांब्यावर थांबतात. याचा फटका लोणावळा शहरात येणारे प्रवासी आणि शहरातून परगावी जाणारे प्रवासी यांना बसत आहे.

  • शहराबाहेरील थांबे बंद करत पुन्हा बस ह्या शहरातील खासगी थांब्यावर येऊ द्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र, वारंवार ह्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आज हजारो प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. याचा गैरफायदा मात्र खासगी प्रवासी वाहनांनी घेतला. प्रवासाकरिता अव्वाच्या सव्वा भाडी घेत प्रवाशांची लुट केली.

मुंबई परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने व घाट भागात वारंवार दरडी पडण्याच्या घटनांमुळे पावसाळा सुरु झाल्यापासून वारंवार रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे. यामुळे पर्यायी सरकारी प्रवासी मार्ग म्हणून प्रवासी एसटी बसचा पर्याय निवडतात. मात्र, बसस्थानकात बसच येत नसल्याने प्रवाशांना मनस्तापासह गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.

  • परिवहन मंत्र्यांनी तसेच स्थानिक प्रशासनाने यावर तोडगा काढत शहराबाहेरील बस थांबे बंद करुन पुन्हा एसटी बस शहरातील अधिकृत थांब्यावर आणाव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.