Pimpri : महापालिका करणार निगडी ते देहूरोड या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज – सध्या जगात ग्लोबल वार्मिंगचे धोके वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्याची नितांत आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेला वृक्षरोपणाचा उपक्रम हा स्तुत्य स्वरुपाचा असल्याचे मत राज्यमंत्री, कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन महाराष्ट्र राज्य, संजय तथा बाळा भेगडे  यांनी व्यक्त केले. तर निगडी ते देहूरोड या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस महापालिका देशी वृक्षांची लागवड करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

राज्य सरकार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, श्री.क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फाऊंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विदयमाने देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गत वक्षारोपण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. आज सकाळी लोकशहीर अण्णाभाऊ साठे बसस्थानक, निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका शैलेजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक भिमा बोबडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्यलेखा परीक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, श्री क्षेत्र देहू संस्थानचे शिवाजी महाराज मोरे, मधुकर महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मारे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, संजय महाराज मोरे, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा.निता मोहिते, शिक्षणाधिकारी पराग मुंढे,‍ उद्यान निरीक्षक दत्तात्रय गायकवाड, प्रकाश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अजय पाताडे, संतोष तापकीर, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले व मोठया संख्येने विदयार्थी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी भेगडे म्हणाले, पर्यावरण हे आपल्या जिवाभावाच्या नातेसंबंधासारखे आहेत. त्यांची काळजी घेऊन त्यांचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग आपल्यावर प्रेम करतो त्यामुळे आपणही निसर्गावर प्रेम केले पाहिजे. निर्मलवारी व हरितवारीचे महत्व वाढत आहे. एक झाड लावल्यास आपणास किती ऑक्सिजन मिळतो याची प्रचिती आपणास येईल. त्यावेळी वृक्षरोपणाचे महत्त्व आपल्याला समजेल. आपल्या भागातील नद्यांचे प्रदूषण कसे कमी करता येईल यासाठी सर्वांनी नियोजन केले पाहिजे. राज्यसरकार स्वच्छतेसाठी, प्रदूषण रोखण्यासाठी, वृक्षलागवड करण्यासाठी मोठया प्रमाणावर मदत करत आहे. राज्यसरकारच्या वतीने देहू ते पंढरपूर वृक्षारोपण करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्यसरकार महाराष्ट्रात ३३ कोटी वृक्षांची लागवड करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी १ लाख ५० हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे सवंर्धनही करणार आहे. निगडी ते देहूरोड या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षांची लागवड करणार आहे. भविष्यात पालखी मार्गावर वारक-यांना सावलीत विसावाही घेता येईल, प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष दत्तक घ्यावे. आठवडयातून किमान एकदा त्या वृक्षास भेट देऊन त्याची निगा राखावी, एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवी संस्थांनी व शहरातील नागरिकांनी दररोज आपल्या परीसरातील पाच ते सहा वृक्षांचे संगोपन करावे असेही ते म्हणाले.

शिवाजी महाराज मोरे म्हणाले, सर्व वारक-यांनी भजन, किर्तनाबरोबर वृक्षारोपण करून ते संभाळले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस नाही. दुष्काळ पडलेला आहे. देहू ते निगडी पालखी मार्गावर वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब अशा देशी वृक्षांची लागवड मोठ्या  प्रमाणात करण्यात येणार आहे. पंढरपूर येथे एकूण १४० पालख्या येत असतात. त्या सर्वांनी पालखी मार्गावर वृक्षारोपण करावे. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्र हरीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक वारक-याने एकतरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निता मोहिते यांनी केले, सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले तर आभार रमेश भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.