Lonavala : कळस चोरीच्या निषेधार्थ कार्ला फाट्यावर भाविकांची महाआरती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिर‍ाचा कळस चोरीला जाऊन एक वर्ष पुर्ण झाले तरी कळस व कळस चोरांचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ आज कार्ला फाटा याठिकाणी भाविकांच्या वतीने महाआरती करण्यात आली.

शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डाॅ. निलम गोर्‍हे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खासदार सुरेश टावरे, माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेवक अर्जुन भोईर, विश्वस्त मदन भोई, नवनाथ देशमुख, विलास कुटे यांच्यासह कोळी आग्री समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना निलम गोर्‍हे म्हणाल्या एकविरा देवीच्या कळसाची चोरी करणार्‍या चोरांच्या हेतूविषयी शंका असून चोरी ही मंदिर कमिटीला बदनाम करण्यासाठी झाली आहे. या चोरीचा तपास सीआयडीकडे आहे. माझ्या माहितीप्रमाणे चोर सीआयडीच्या हाती लागले असताना देखिल ते समोर आणले जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्री व सीआयडीचे महासंचालक यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. आज या राज्यात शक्ती स्वरुपींनी देवी सुरक्षित नसेल तर आया बायांची सुरक्षा कोण करणार अशा स्वरुपात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे म्हणाले कळस चोरीचे कटकारस्थान काही ग्रामस्त व गावगुंडांनी केले आहे. पोलीसांनी तातडीने या चोरांचे चेहरे समाजासमोर आणावेत अन्यथा उग्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल. तसेच वन विभागाच्या जागेवर असलेले पायथा मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे. मच्छिंद्र खराडे यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत सर्वसामान्यांवर पोलीसींग दाखविण्यापेक्षा चोरांचा शोध घ्या असा टोला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.