Maharashtra Corona Update : राज्यात 6,185 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 18 लाखांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्यानं 6 हजार 185 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 18 लाख 08 हजार 550 एवढी झाली आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 16 लाख 72 हजार 627 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या 87 हजार 969 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 4 हजार 89 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा रिकव्हरी रेट 92.48 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 85 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 46 हजार 898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.59 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 35 हजार 600 नमूणे तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 28 हजार 395 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 248 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण सध्या पुण्यात असून त्या खालोखाल ठाणे, मुंबई आणि अहमदनगर येथे आहेत. रुग्णसंख्येत सप्टेंबरपासून घट होत असली तरी आठवडय़ाचा मृत्युदर दोन ते अडीच टक्क्यांदरम्यान स्थिरच आहे, तर एकूण मृत्युदर 2.59 टक्के आहे. मृत्युदर एक टक्क्याखाली आणणे हे आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक ठरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.