Maharashtra News :रब्बी हंगामात वीजपुरवठा अखंडित सुरू राहणार – ऊर्जामंत्री 

एमपीसी न्यूजयेत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी,असे आवाहनही ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले.

 

ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगडला ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाशगड येथे आयोजित बैठकीत परतीच्या पावसामुळे राज्याच्या काही भागात झालेल्या वीजयंत्रणेच्या नुकसानीचा आढावा आणि राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती तसेच इतर विविध मुद्द्यांवर बैठक घेतली.

 

 

 

यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे तसेच चारही वीज कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. या बैठकीस राज्यभरातील सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक तसेच मुख्य अभियंता हे व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सहभागी झाले होते.

 

 

 

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले, कोविड -19 मुळे वीजक्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. वीजबिलांची वसुली अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. एकीकडे महसुलात घट होताना दुसरीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अवकाळी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसाची अतिवृष्टी यामुळे यंदा राज्यभरातील वीजयंत्रणेला मोठे तडाखे बसले आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दर्जेदार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी वीजयंत्रणा नेहमी पाण्याखाली जाते, त्याचा अभ्यास करून भविष्यात असे प्रकार घडणार नाही अशा उपाययोजनांचा आराखडा तयार करून लगेचच या कामास सुरवात करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

 

यासोबतच अतिवृष्टीमधील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी किंवा साहित्याची आवश्यकता असल्यास ती त्वरीत पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त स्वरुपात रोहित्र उपलब्ध करून ठेवावेत. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार ऑईल व इतर साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

 

 

 

सद्यस्थितीत वीजपुरवठ्यासंबंधी वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरु असून पावसाच्या पाण्याच्या निचरा झाल्यानंतर कृषिपंपांचा वीजपुरवठा टप्पाटप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.