Manobodh by Priya Shende Part 73 : देहे दंडणेचे महादुःख आहे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 73

देहे दंडणेचे महादुःख आहे

महादुःख ते नाम घेता न राहे

सदाशिव चिंतीतसे देव देवा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा

पुन्हा एकदा रामनामाचा महिमा, समर्थ या श्लोकात सांगताहेत.  भगवंत प्राप्ती साठी जे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक मार्ग म्हणजे तपःसाधना.  यामध्ये कमीत कमी बारा वर्ष (एक तप) भगवंताचे नामस्मरण करतात तेही एकांतात.  याचबरोबर काही साधक अत्यंत कठोरपणे ही तपश्चर्या करतात.  जसं की पाण्यात उभे राहून, एका पायावर उभा राहून, उपास-तापास करून.  म्हणजेच देहाला कष्ट देऊन ही तप:साधना करतात.  जेणेकरून देहाला कष्ट होतील आणि हा देहाविषयी आसक्ती राहणार नाही. यालाच समर्थ देहदंड म्हणतात.  अशा प्रकारे जेव्हा देहदंड घेतला जातो, तेव्हा त्याने शरीराला खूप वेदना होतात आणि त्यालाच समर्थांनी महादुःख भोगून भगवंत प्राप्ती करून घेणे असं म्हणतात.

समर्थ पुढे म्हणताहेत, “महादुःख ते नाम घेता न राहे”.  हे महादुःख नको असेल, तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रामनाम.   ते सांगतात की साधं सोपं रामनाम जपलं तरी परमेश्वर प्राप्ती होईल.  तर या सोप्या मार्गाने जा.  आपण नुसतं नामस्मरण जरी केलं, तरी ते महादुःख भोगायला नको.

 

 

 

याचा अजून एक अर्थ असाही निघू शकतो की, मुळात जन्माला येणं हेच महादुःख आहे.  काहीतरी इच्छा, वासना अपूर्ण राहिल्या, तर त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तेच मुळी लज्जास्पद आहे.  हा जर जन्म-मरणाचा फेरा चुकवायचा असेल, तर त्यासाठी रामनाम जपा.  नामस्मरणासारखा सोपा सहज मार्ग नाही.  तो फक्त अवलंबला पाहिजे.

हा मार्ग सगळ्यांनी अवलंबावा म्हणून समर्थ उदाहरण देत आहेत, की कोण कोण हे चिंतन करतं. आपल्या डोक्यात तेव्हाच नीट बसतं, जेव्हा ते कोण करतंय आणि त्याचा फायदा त्यांना झालाय, हे कळतं.

 

समर्थांनी तिसऱ्या चरणात म्हंटलं, “सदाशिव चिंतीतसे देव देवा”, सदाशिव म्हणजे शिवशंकरजी जे स्वतः देव आहेत.  असं असून सुद्धा देवाधिदेव परमेश्वराचे चिंतन प्रभू शंकर करतात.  त्यांची भक्ती करतात.  त्यांची तपश्चर्या करतात.  इतका त्या नामस्मरणाचा, चिंतनाचा महिमा अगाध आहे.  माणसाला कोण्या थोरामोठ्यांची उदाहरणे दिली की विषय पटकन समजतो.  म्हणून भगवान शंकरांचं उदाहरण ते देत आहेत.

 

आणि हे नामस्मरण केव्हा कराल?  तर सततच करावं.  पण पहाटे पासूनच केलं, तर ते दिवसभर आपल्या ओठी राहील, मनी राहील आणि चित्तात राहील.  म्हणून समर्थ म्हणतात की,”प्रभाते मनी राम चिंतीत जावा”.

 

 

 

जय जय रघुवीर समर्थ

 

 

प्रिया शेंडे

 

 

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.