Maval Corona Update: तळेगावमध्ये चारजणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, मावळात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 20 वर!

Maval Corona Update: Four people report positive in Talegaon, number of active corona patients in Maval rises to 20! एकाच कुटुंबातील तिघांना तर एका कोरोना योद्ध्यालाही कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेच्या आनंदनगर भागात तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या कोरोनाबाधित 65 वर्षीय महिलेच्या कुटुंबातील तीन जणांचे तसेच राव कॉलनी भागात राहणाऱ्या एका 48 वर्षीय शासकीय आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 20 वर जाऊन पोहचली आहे.

तळेगाव स्टेशन भागातील आनंदनगर परिसरात मुंबईहून आलेली एक 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तिच्या घरातील मुलगा (वय 36), सून (वय 30)  नात (वय 7) यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तिघांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

या खेरीज तळेगाव मधील कोविड केंद्रात रुग्णांना औषध देण्याचे काम करणाऱ्या एका 48 वर्षीय कोरोना योद्ध्याचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. हा कर्मचारी तळेगावच्या राव कॉलनी भागातील रहिवासी आहे. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील तिघांचे तळेगाव येथील सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.

हे दोन्ही रिपोर्ट शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्याचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण 37 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 17 जणांनी कोरोनावर मात केली असून आता मावळ तालुक्यात 20 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मावळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच कडधे आणि माऊ येथील दोन कुटुंबांतील एकूण 12 जणांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्या पाठोपाठ आता तळेगावमध्ये चार रुग्ण सापडल्याने सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे.

तळेगावात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन झिंजाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.