Maval Corona Update: परंदवडी येथील शिक्षिकेला कोरोनाचा संसर्ग, तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 वर!

Maval Corona Update: Teacher at Parandwadi infected with corona, number of active patients in the taluka rises to 13!

एमपीसी न्यूज – मावळात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. परंदवडी येथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय शिक्षिकेचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आणखी एक नवीन रूग्ण वाढल्यामुळे तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 13 झाली आहे. 

परंदवडी येथे राहणाऱ्या व तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत काम करणाऱ्या शिक्षिकेचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. ही शिक्षिका फक्त एकदा तळेगाव येथे खरेदीसाठी गेली होती. कोणाच्या संपर्कात आल्यामुळे तिला कोरोना झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ही शिक्षिका कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिच्या निकटच्या संपर्कातील सहा जणांना तळेगाव येथील सुगी पश्चात प्रशिक्षण संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

गेल्या 22 दिवसांमध्ये मावळात शहरी भागात 5 व ग्रामीण भागात 10 अशा एकूण 15 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13 झाली आहे. मावळातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

परंदवडी कन्टेनमेंट झोन

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने संपूर्ण परंदवडी गाव कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून सोमाटणे, धामणे व बेबेड ओहोळ ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत, असा आदेश मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी काढला आहे.

काल (गुरुवार ) कामशेत येथील नऊ महिन्यांच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. परवा (बुधवार) खंडाळा येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. सलग तिसऱ्या दिवशी परंदवडी येथील 40 वर्षीय शिक्षिकेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

तळेगावात 7 मे रोजी तालुक्यातील पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला. ते दोन्ही रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यानंतर 19 मे अहिरवडे, 20 मे नागाथली, 21 मे वेहेरगाव व चांदखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

22 मेला तळेगावमध्ये एकजण तर 23 मेला पुन्हा चांदखेड येथे 4 रुग्ण आढळले तर 24 मे घोणशेत आणि 25 मे व 26 मे या दोन दिवस ब्रेक मिळाला आणि 27 मेपासून परत सलग दिवस नवीन कोरोना रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.