Maval : कामगारांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – कंपनीतून कामावरून घरी जात असलेल्या मॅनेजरवर रस्त्यात ( Maval ) अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडेपाच वाजता पवनानगर ते बेबडओहळ मार्गावर मानेग्रो कंपनीजवळ घडली.

सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय 47, रा. मावळ. मूळ रा. बाभूळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील कर्मचारी किरण मानसिंग भोसले (वय 47, रा. मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी कंपनीतील कामगार कुमार ओझरकर (वय 25, रा. शिवणे, मावळ) याला अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune: अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रद्द करा – माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी कुमार हा मानेग्रो कंपनीत काम करतो. तिथेच अडसूळ हे मॅनेजर पदावर काम करत होते. अडसूळ हे कंपनीतील कामे सतत सांगतात असा राग कुमार याच्या डोक्यात होता. त्यावरून त्यांच्यात पूर्वी शाब्दिक खटके उडाले होते.

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अडसूळ हे दुचाकीवरून कंपनीतून घरी जात होते. त्यावेळी आरोपीने दुचाकीवरून येऊन कंपनीपासून काही अंतरावर अडसूळ यांना अडवले. त्यांना स्टीलच्या पाईपने डोक्यात आणि शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली. या हल्ल्यात अडसूळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शिरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी सांगितले की, याप्रकरणी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ केली जाणार आहे. आरोपी कुमार याला बुधवारी दुपारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेतले ( Maval ) आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.