Maval News : जलसंपदा विभागाने प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, अन्यथा जनआंदोलन करु – आमदार शेळके

तालुक्यातील पाटबंधारे विभागाची कामे 10 जुलैपर्यंत मार्गी लावा अन्यथा पवना धरणातून सोडले जाणारे पाणी अडवू; आमदार सुनिल शेळके यांचा पाटबंधारे मंडळाला इशारा

एमपीसी न्यूज – मावळ मतदारसंघातील जलसंपदा विभागाकडील कामे मंजूर होऊनही त्यांची टेंडर अद्यापही झालेली नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्तिश: लक्ष घालून मावळ मतदारसंघातील कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना एका वर्षापूर्वी दिलेल्या आहेत, तरीही पाटबंधारे मंडळाकडून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मावळ तालुक्यातील पाटबंधारे विभागाची कामे 10 जुलै पर्यंत मार्गी लावा अन्यथा पवना धरणातून खाली सोडले जाणारे पाणी अडवण्यात येईल, असा इशारा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे दिला आहे.

मावळ मतदारसंघातील जलसंपदा विभागाकडील विविध कामे मंजूर झाली आहेत. डोणे, आढले बु., आढले खुर्द, दिवड, राजेवाडी, ओवळे व चांदखेड अशा सात गावांसाठी पवना नदीवरुन उपसासिंचन राबविणे व मावळ तालुक्यातील नद्यांवर विविध ठिकाणी घाट बांधण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. असे असतानाही त्यासंदर्भात अद्यापपर्यंत आपल्या विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

पवना व इंद्रायणी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व त्यावरील पूल बांधणे व दुरुस्ती करणेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्तिश: लक्ष घालून ती कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना एका वर्षापूर्वीच दिलेल्या आहेत.

पवना प्रकल्पामुळे बाधित झालेल्या उर्वरित 863 प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटप करणे.अशा अनेक कामांसाठी आमदार शेळके यांनी अनेकदा पाटबंधारे मंडळाकडे पाठपुरावा केला आहे. तरीही पाटबंधारे मंडळाकडून कामे चालू करण्याच्या दृष्टीने अद्याप प्रगती दिसून आलेली नाही.

मावळ मतदारसंघातील कामांमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे. मंजूर झालेली सर्व कामे 10 जुलैपर्यंत मार्गी लावण्यात यावी.अन्यथा पवना प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती व ग्रामस्थ यांच्या मार्फत पवना धरणाच्या खालील बाजूस जन आंदोलन करून धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्यात येईल. याची सर्व जबाबदारी पाटबंधारे विभागाची असेल असेही आमदार शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.