Maval/ Shirur : अर्ज भरुनही नवमतदारांची मतदार यादीत नावे नाहीत; मतदारांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज – भारतीय निवडणूक आयोगातर्फे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. तर, दुसरीकडे मतदान नाव नोंदणी करुन घेण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांच्या गलथान कारभारामुळे मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील अनेक नवमतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. मतदार नावनोंदणीचा रितसर अर्ज भरुनही अनेक नवमतदारांची नावे अंतिम मतदार यादीत आले नाहीत. त्यामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तरुणांमध्ये पहिल्यांदा मतदान करण्यासाठी प्रचंड उत्साह असतो. त्यासाठी वयाची अट पुर्ण केल्यानंतर मतदार नाव नोंदणीचा अर्ज दाखल करतात. परंतु, मतदान नाव नोंदणी करुन घेण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांच्या गलथान कारभाराचा नाहक फटका मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील अनेक तरुणांना बसल्याचे दिसून येत आहे.

तळेगाव दाभाडे येथील रहिवाशी असलेल्या आणि नोकरीसाठी बंगळुरुमध्ये कार्यरत असलेल्या शिवानी बासुतकर या मतदार नावनोंदणी करण्यासाठी बंगळुरुमधून तळेगावमध्ये आल्या होत्या. बासुतकर यांनी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात जाऊन मुदतीमध्ये मतदार नावनोंदणीचा रितसर अर्ज भरला. मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार असल्याने त्या मतदानाला देखील येणार होत्या. परंतु, रितसर अर्ज भरुनही अंतिम मतदार यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे त्या निराश झाल्या.

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना शिवानी बासुतकर म्हणाल्या, ”पहिल्यांदाच मतदान करायचे म्हणून उत्साह होता. त्यासाठी बंगळुरु येथून येऊन मतदार नाव नोंदणीचा रितसर अर्ज भरला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला पहिले मतदान करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद होता. परंतु, अंतिम मतदार यादीत नाव आले नाही. त्यामुळे निराशा झाली”

याबाबत बोलताना मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी म्हणाल्या, ”मावळ मतदारसंघात मतदार यादीत नाव आले नसल्याच्या जास्त तक्रारी नाहीत. ज्यांची नावे आली नाहीत. त्यांच्या अर्जात अडचण असल्याने मतदार यादीत नावे आली नसतील. त्यासाठी आत्ता काही करु शकत नाही. अनेकांनी शेवटच्या क्षणी अर्ज दिले आहेत. मतदार नावनोंदणी करण्याची प्रक्रिया सहा महिने अगोदरपासून सुरु होती. ज्यांची नावे आली नाहीत. त्यांनी निवडणूक झाल्यानंतर नावनोंदणी करुन घ्यावी. त्यांना विधानभा निवडणुकीत मतदान करता येईल. मतदाराने जबाबदारीने अर्ज भरुन घेणे अपेक्षित आहे. अर्ज भरल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. यंत्रणेची आणि स्वत: मतदाराची देखील जबाबदारी आहे”

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या कृष्णानगर परिसरातील नागरिकांनी 3 मार्च 2019 रोजी कृष्णानगर येथील एका शाळेत मतदार नावनोंदणीचा अर्ज भरला होता. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली असल्याने त्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यानंतर संबंधित अर्ज स्वीकारणा-या कर्मचा-यांनी अर्ज नावनोंदणी करण्यासाठी पाठविले नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. अर्ज कुठे गेले आहेत, ते सुद्धा कर्मचा-यांना माहित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मतदार नावनोंदणी अर्ज भरुनही मतदारयादीत नाव नसलेले शीतल वाणी म्हणाले, ”कृष्णानगर येथील गनगे प्रशालेत मतदार नाव नोंदणीचा अर्ज स्वीकारले जात होते. माझा आणि मुलीचा मतदार नावनोंदणीचा अर्ज 3 मार्च 2019 रोजी शाळेतील शिक्षिकेकडे भरुन दिला होता. माझ्यासह परिसरातील सुमारे 500 ते 600 नागरिकांनी मतदार नावनोंदणीचे अर्ज भरले होते. त्यामध्ये नवमतदारांची संख्या मोठी होती. यापैकी केवळ 9 लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.

उर्वरित नागरिकांची नावे समाविष्ट न झाल्याबाबत विचारले असता निवडणूक अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. एकीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे. तर, दुसरीकडे मतदारांनी नाव नोंदणीचे अर्ज भरुनही अधिका-यांच्या गलथान कारभारामुळे त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागत आहे” असेही वाणी म्हणाले.

याबाबत संबंधित अधिका-यांना विचारले असता असे काही झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.