Maval : शिवशाही संग्रहालय शिवप्रेमींच्या ज्ञानात भर पाडेल – कृष्णराव भेगडे

एमपीसी न्यूज – मागील वीस वर्षांपासून अतिशय प्रयत्नाने डॉ. प्रमोद बोराडे यांनी हजारो शस्त्रांचा संग्रह केला (Maval) आहे. मावळ परिसरात येणारे पर्यटक आणि इतिहास प्रेमी यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी या शिवशाही संग्रहालयाची मोठी मदत होईल, असे माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले. शिवशाही ऐतिहासिक शस्त्रास्त्र व वस्तु संग्रहालयात खंडेनवमी निमित्ताने माजी आमदार कृष्णराव भेगडे व नंदकुमार शेलार यांच्या हस्ते शस्त्रास्त्र पूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
भारतीय संस्कृतीमध्ये शस्त्रास्त्र पूजनासाठी खंडेनवमी या दिवसाचे महत्व विशाल आहे. मावळ तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून शस्त्रास्त्र वारसा मोठा लाभलेला असून शिवछत्रपतींचे मावळे देखील खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रास्त्र पूजन यथोचित करीत असत. हाच पायंडा आज तागायत मावळ तालुक्यात सुरू असून शिवशाही ऐतिहासिक शस्त्रास्र व वस्तू संग्रहालयामध्ये माजी आमदार, मावळभूषण कृष्णराव भेगडे साहेबांच्या हस्ते शस्त्रास्त्र पूजनाचा (Maval)
यथोचित समारंभ पार पडला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर समारंभास सुरुवात झाली. सोमनाथ बोराडे व डॉ. प्रिया बोराडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी कृष्णराव भेगडे म्हणाले, “हजारो शस्त्रास्त्रांचा संग्रह डॉ प्रमोद बोराडे यांनी मागील वीस वर्षे अतिशय प्रयत्नाने केलेला आहे. लोणावळा येथे पर्यटक बहुसंख्येने असतात. त्यांना निश्चितच या मावळ तालुक्यातील एकमेव असणाऱ्या शिवशाही संग्रहालयाचा फायदा होईल. ‘लोणावळा वॅक्स म्युझियम’ आणि ‘शिवशाही संग्रहालयाला’ मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.
नंदकुमार शेलार म्हणाले,”मावळ तालुक्याची भूमी ही पराक्रमाची आणि ऐतिहासिक भूमी असून याच शस्त्रास्त्रांनी मध्ययुगामध्ये मोठा पराक्रम गाजविला होता. शस्त्रास्त्र संग्रहालय हे मावळ तालुक्याचे निश्चितच भूषण ठरले आहे. लोणावळा वैक्स म्यूज़ियम हे लोकप्रिय ठरलेले आणी पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असल्याने एकमेकांस पूरक असा संस्कृतीचा ठेवा चौहान व डॉ.बोराडे यांनी ठेवला आहे.”
लोणावळा वॅक्स म्युझियमचेे निर्माते राजेंद्र चौहान यांनी कृष्णराव भेगडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. डॉ.प्रमोद बोराडे यांनी नंदकुमार शेलार यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. धवल चौहान यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.