Bhosari News : भोसरी एमआयडीसी परिसरात उद्योजकांच्या विविध समस्यांबाबत उद्योजक आणि पोलिसांची बैठक

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना येणा-या विविध अडचणी सोडविण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची बैठक एमआयडीसी भोसरी येथे पार पडली. या बैठकीत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी उद्योजकांना त्यांच्या अडचणी लवकर सुटतील असे आश्वासन दिले.

बैठकीसाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, एमआयडीसी भोसरीचे पोलीस निरीक्षक आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तांचे स्वागत इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर व उद्योजक यांनी केले.

अभय भोर यांनी औद्योगिक परिसरातील समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. उद्योजकांनी देखील आपल्या समस्या बैठकीत मांडल्या. आयुक्त अंकुश शिंदे यांनी, परिसरामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण लवकरच कमी होईल. गुन्हेगारांना कठोर शिक्षा करून गुन्हेगारी कमी करण्यावर भर दिला जाईल तसेच उद्योजकांच्या वेळोवेळी बैठका लावून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महिला कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत. परिसरात सुरक्षा गस्त वाढविण्याची मागणी पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केली.

सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन एमआयडीसी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.