Pimpri News : राममंदिर ही देशाची अस्मिता – गुरुवर्य भास्कर गिरी महाराज 

एमपीसी न्यूज – “राममंदिर ही देशाची अस्मिता आहे”, असे विचार श्री दत्तमंदिर संस्थान, देवगड (नेवासा) येथील गुरुवर्य भास्कर गिरी महाराज यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे शनिवारी (दि २८ मे) सावरकर मंडळ, निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर आणि सचिव प्रदीप पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते.

पुरस्कारांचे हे चौदावे वर्ष होते. या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी (रुपये एक लक्ष आणि सन्मानचिन्ह) ॲड. मदन मोहन पांडेय (श्रीराम जन्मभूमी खटल्यातील प्रमुख वकील) आणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी (रुपये एकावन्न हजार आणि सन्मानचिन्ह) अकोला येथील ज्येष्ठ कारसेवक श्रीकांत कोंडोलीकर यांना गुरुवर्य भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना ॲड. मदन मोहन पांडेय यांनी रामजन्मभूमी खटल्याची सविस्तर माहिती कथन करून, “परमेश्वराने मला या खटल्यात काम करण्याची सुवर्णसंधी दिली. राममंदिर व्हावे, ही ईश्वराची इच्छा होती. काशी, मथुरा ही मंदिरेही लवकरच हिंदूंच्या ताब्यात येतील!” अशा भावना व्यक्त केल्या; तर श्रीकांत कोंडोलीकर यांनी, “हिंदुत्व विचारसरणीचे आणि पुरोगामी कृतिशीलतेचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा पुरस्कार मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो!” अशी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी पुरस्काराची रक्कम सेवाभावी संस्थांना प्रदान केली.

भास्कर गिरी महाराज पुढे म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे खऱ्या अर्थाने धर्मवीर महात्मा होते. रामजन्मभूमीचा वाद ही देशासाठी शोकांतिका होती. पाचशे वर्षांपासून हिंदूंनी त्यासाठी अन्याय सहन केला. हिंदूंनी कधीही कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवाराने भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत करून कोणी आमच्यावर हात उगारला तर त्याचे मनगट पकडण्याचे सामर्थ्य निर्माण केले. त्यामुळे भावी काळात हे राष्ट्र हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जाईल.”

पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड शाखेने ‘स्फूर्तिगाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विश्वनाथन नायर यांनी स्वागत केले. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शैलजा सांगळे, निवेदिता कच्छवा आणि राजेंद्र देशपांडे यांनी मान्यवर आणि पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर रिकामे यांनी आभार मानले. सिद्धी कापशीकर या विद्यार्थिनीने सादर केलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम’ने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.