Pimpri: सीएमचा सांगावा घेऊन गिरीश महाजन आमदार लक्ष्मणभाऊंच्या भेटीला

लक्ष्मण जगताप प्रचारात सक्रिय होणार?
एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप महाजन यांनी जगताप यांना सांगितला. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निरोपानंतर आता जगताप प्रचारात सक्रिय होणार का, याकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 
पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या  ‘चंद्ररंग’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झालीे. दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली आहे. महाजन यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप देण्याबरोबरच मावळ मतदारसंघातील प्रचाराची माहिती घेतली. यावेळी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार हे देखील उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघाची शिवसेनेची उमेदवारी खासदार बारणे देण्यात आली आहे. शिवसेना- भाजपची युती झाली, मात्र बारणे आणि  भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैमनस्य कायम राहिले आहे.  बारणे यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. जगताप अजूनही प्रचारात सक्रिय झाले नाहीत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय बैठकीकडे देखील जगताप यांनी पाठ फिरविली होती.
त्यापार्श्वभूमीवर  महायुतीचे उमेदवार बारणे यांनी  28 मार्च रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली होती. यानंतर बारणे यांनी जगताप यांच्यासोबतच्या मतभेदला पूर्णविराम दिल्याचे सांगितले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांची शिवसेनेच्या उपनेत्या,  प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे यांची  भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना नेते राऊत यांनी देखील दोन दिवसांपूर्वी  जगताप यांची भेट घेतली होती. मात्र जगताप प्रचारात सक्रिय झाले नव्हते.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज (सोमवारी) अहमदनगरवरून आमदार जगताप यांच्या भेटीला आले होते. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे आहे, हा मुख्यमंत्र्यांचा निरोप महाजन यांनी जगताप यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
या दोघांमध्ये  सुमारे दोन तास  चर्चा झाली आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निरोपानंतर जगताप प्रचारात सक्रीय होणार का, याकडे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.