Tesla in India : मंत्री जयंत पाटील यांचे उद्योजक एलोन मस्क यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण

एमपीसी न्यूज – जगप्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक एलोन मस्क यांची टेस्ला ही कंपनी भारतात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र अद्याप देशात टेस्ला कार उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांनी एलोन मस्क यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

झाले असे की, एका इंजिनिअर ट्विटर युझरने एलोन मस्क यांना टॅग करत, ‘भारतात टेसला कधी लॉन्च होणार या बाबत काही अद्यावत माहिती आहे का?’ असा प्रश्न विचारला. उद्योजक एलोन मस्क यांनी या युझरला उत्तर देत, ‘अजूनही सरकारच्या अनेक आव्हानासोबत काम करत आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.

मंत्री जयंत पाटील यांनी मस्क यांच्या या ट्विटचा आधार घेत त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण दिले. ‘महाराष्ट्र भारतातील एक प्रगतशील राज्य आहे. राज्यात प्लान्ट उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही तुम्हाला करू, तुमचा उत्पादक प्लान्ट महाराष्ट्रात उभारण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.’ असे जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे.

आता एलोन मस्क जयंत पाटील यांच्या आमंत्रणाचा किती गांभीर्याने विचार करतात आणि महाराष्ट्रात टेसला प्लान्ट सुरू होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.