Moshi News : बोऱ्हाडेवाडी शाळेत 9 वी, 10 वीचे वर्ग सुरू होणार : सारिका बोऱ्हाडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका बोऱ्हाडेवाडी येथील कै. महादू श्रीपती सस्ते मुला- मुलींच्या शाळेत पहिली ते आठवीसोबत आता नववी आणि दहावीचे वर्गही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाग शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांना धडे देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी दिली.

महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या दालनात मंगळवारी बोऱ्हाडेवाडी येथील शाळेतील 9 वी 10 वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे पराग मुंडे, कार्यालयीन अधीक्षक सुजाता गोळे, बोऱ्हाडेवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वनिता भांगे, भारती रिटे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, भोसरी येथील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक झरीन शेख आदी उपस्थित होते.

बोऱ्हाडेवाडीतील शाळेत वाडी व वस्त्यांवरील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याठिकाणी पहिले ते आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थांकडे प्रवेश घ्यावा लागतो. आर्थिकदृष्ट्या खासगी शिक्षण घेण्याकडे संबंधित पालक दुर्लक्ष करतात.

त्यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या कै. महादू श्रीपती सस्ते शाळेत दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असावी, अशी आमची मागणी असल्याचे नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले , शाळेत 9 वी व 10 वीच्या वर्गासाठी महापालिका शिक्षण समितीकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण विभागाची मान्यता मिळण्यास कोरोना परिस्थितीमुळे उशीर होत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाग शाळा सुरू करण्यात येईल. तसेच, 8 वीतून 9 वीमध्ये प्रवेश करणाऱ्या 94 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी समाविष्ट करुन घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.