Pune News : म्युकरमायकोसिस आलेख घटला, ऑक्टोबर महिन्यात सर्वांत कमी रुग्णसंख्याची नोंद

एमपीसी न्यूज – करोनापाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढले होते. मात्र आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागांत आता हा आलेख घटला असून, ऑक्टोबर महिन्यात सर्वांत कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे.

करोनातून बरे झालेल्या पण प्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लागण होत आहे. विशेषत: ऑक्‍सिजनवर उपचार घेणाऱ्यांना हा संसर्ग होत आहे. हा आजार संसर्गजन्य नसला, तरी लागण झाल्यानंतर उपचार वेळेत घेतले नाही तर जीवघेणा ठरू शकतो. अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली.

सध्या पुण्यात 25, पिंपरी- चिंचवडमध्ये 2 ग्रामीण भागात 1, तर ससून रुग्णालयात 25 अशा 53 जणांवर उपचार सुरू आहेत. तेच पंधरा दिवसांपूर्वी ही रुग्णसंख्या दीडशेच्या पुढे होती.

आतापर्यंत पुण्यात 448, पिंपरी-चिंचवडमध्ये 264, ग्रामीण भागात 87 आणि ससून रुग्णालयात 442 अशा 1 हजार 249 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. दरम्यान, एप्रिल ते जून या तीन महिन्यात म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या सर्वाधिक होती. त्यामध्ये जूनमध्ये 426 रुग्ण सापडले तर 111 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. ऑक्टोबर महिन्यात 27 रुग्ण सापडले तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.