IPL 2021 : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 8 गडी आणि 12 षटके राखून चिरडले

 युवा ईशान किशनला गवसली योग्य वेळी लय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – शारजाच्या मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने कडक खेळ करत राजस्थान रॉयल्सचा दणदणीत पराभव करून पुढे दमदार पाऊल टाकले.

प्रतिष्ठा पणाला लागलेले दोन्हीही संघ आपले सर्वस्व पणाला लावून खेळणार यात कोणालाही काही शंका नव्हती. त्यामुळे एक चुरशीची लढत बघायला मिळेल, अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना होती. त्यातच सामना शारजाच्या मैदानावर असल्याने कमी धावसंख्येचा होतो असा इतिहास आहे आणि कमी धावसंख्येचे सामने बऱ्याचदा रंगतदारही होतात, हे ही आपण अनुभवलेले आहेच. पण मुंबई इंडियन्सने सर्वांगसुंदर आणि प्रतिस्पर्धी संघाला चिरडून हा समज खोटा ठरवला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहितने काल डीकॉकच्या जागी ईशान किशनला संघात स्थान दिले.

राजस्थान रॉयल्स कडून सलामीची सुरुवात यशस्वी जैस्वाल आणि एविन लेविस यांनी केली. दोघांनी तीन षटकात 27 धावा जोडल्याच होत्या की जैस्वाल केवळ 12 धावांवर कुलटननाईलच्या चेंडूवर झेलबाद झाला. मागील काही सामन्यातली त्याची फलंदाजी बघता राजस्थान रॉयल्सच्या संघाला त्याच्याकडून आजही तसाच खेळ अपेक्षित होता. पण त्या अपेक्षा पार पाडण्यात जैस्वाल आज तरी”यशस्वी” झाला नाही. त्याच्या जागी आलेल्या कर्णधार संजूने महत्वाच्या सामन्यात संघाला काहीही योगदान दिले नाही, तो आणि दुसरा सलामीवीर लेविस चार चेंडूच्या फरकाने बाद झाले आणि राजस्थान संघ 3 बाद 41 अशा बिकट परिस्थितीत आला.

लेविस बुमराहची तर संजू निशामची शिकार ठरला. राजस्थान रॉयल्स यातून सावरेल असे वाटत होते कारण मागील सामन्यात धडाकेबाज खेळलेला शिवम दुबे मैदानावर होता. पण हाय रे दुर्दैवा, दुबेही केवळ तीन धावा काढून निशामच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि आणखी दोन धावांची भर पडताच ग्लेन फिलिप्स हा युवा फलंदाज सुद्धा तंबूत परतला.

10 षटकाच्या आतच अर्धा संघ तंबूत परतला होता आणि धावफलकावर केवळ 50 च धावा लागलेल्या होत्या. आता राजस्थान रॉयल्सच्या सर्व आशा किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड मिलरवर केंद्रीत होत्या. त्याला साथ घ्यायला राहुल टेवटीया आलेला होता. धावा काढणे अवघड झालेले होते आणि त्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज आग ओकत होते. यात राजस्थानचे सर्वच फलंदाज होरपळून गेले, सलामीच्या जोडीचा आणि मिलर, टेवटियाचा अपवाद सोडता सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

पत्त्याच्या बंगल्यासारखा राजस्थान रॉयल्सचा डाव कोसळला. दुःखात सुख इतकेच की एवढी पडझड होवूनही सर्वबाद झाले नाही. मुंबईकडून तिन्ही वेगवान गोलंदाजानी तुफानी गोलंदाजी टाकत राजस्थान संघाला गुंडाळून टाकले. निशामने अत्यंत घातक गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 12 धावा देत तीन तर कुलटननाईलने तेवढ्याच षटकात चार बळी प्राप्त केले. बुमराहने दोन बळी घेतले, या अशा गोलंदाजीमुळे संपूर्ण डावात 7 चौकार आणि दोन षटकार आले. त्यामुळेच 20 षटकात केवळ 90 धावा असा नीचांकी स्कोअर धावफलकावर लागला. 2 बाद 41 ते 9 बाद 90 असा प्रवास विजय मिळवून देणारा नक्कीच नव्हता.

91 धावांचे म्हटले तर मामुली, म्हटले तर कठीण लक्ष डोळ्यासमोर ठेवून खेळताना कर्णधार रोहीत आणि पुनरागमन करणारा ईशान किशन यांनी सुरुवात केली. रोहीतने पहिल्याच षटकात एक चौकार आणि एक षटकार मारत 14 धावा चोपून भन्नाट सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकात किशन मात्र अडखळत होता. त्यामुळे दुसरे षटक चक्क निर्धाव गेले. तिसऱ्या षटकात चक्क संजू सॅमसनकडून रोहीतला जीवदान मिळाले. याचा फायदा उठवून तो आज तरी मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच रोहीत साकरीयाच्या गोलंदाजीवर 13 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. त्याने दोन षटकार त्यात मारले. त्याच्या जागी आलेल्या यादवांचा सूर्यकुमार तळपायला लागला असे म्हणेपर्यंत तो 8 चेंडूत 13 धावा काढून मुस्तफिजूरच्या चेंडूवर झेलबाद झाला.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानी वेगवान फलंदाजी करत हा सामना मोठया फरकाने जिंकण्याचा निश्चय केला होता, त्याला अनुसरून पहिल्या पॉवरप्लेकमध्ये मुंबई इंडियन्सच्या दोन गड्याच्या मोबदल्यात सहा षटकात 56 धावा झाल्या होत्या. मुंबई नक्कीच जिंकेल असे वाटत होतेच, फक्त किती षटके आणि किती गडी राखून जिंकणार इतकीच उत्कंठा होती. आज ईशान किशनने पुनरागमन करताना पहिले सहा चेंडू निर्धाव घातल्यानंतरही केवळ 25 चेंडूत नाबाद 50 धावा ठोकून संघाला केवळ 8 षटक आणि दोन चेंडुतच 8 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला.

या विजयाने मुंबई अंकतालिकेत पाचव्या क्रमांकावर आले असले तरी त्यांच्या आणि चौथ्या स्थानाच्या मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आहेच. पंधरा धावात चार गडी बाद करणारा आणि राजस्थान रॉयल्सला गुंडाळणारा नाथन कुलटन नाईलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.