22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Mumbai News : मावळ तालुक्यातील एमआयडीसीत भूमिपुत्रांना रोजगार मिळावा : आमदार सुनील शेळके

spot_img
spot_img

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील  स्थानिक भूमिपुत्रांना एमआयडीसीमधील कंपन्या कामावर घेण्यास टाळाटाळ करत आहेत. विविध कारणे देऊन स्थानिकांना जाणून-बुजून डावलले जात असल्याने बेरोजगारी वाढत आहे. भविष्यात नवीन कंपन्यांना तालुक्यात जागा उपलब्ध करून देत असताना राज्याच्या रोजगार धोरणानुसार स्थानिकांना प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार सुनिल शेळके यांनी यावेळी केली.

एमआयडीसी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार शेळके यांनी राज्याच्या उद्योग व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची आज, मंत्रालय येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके यांनी मंत्री तटकरे यांच्याकडे मावळ तालुक्यातील एमआयडीसी संदर्भातील विविध प्रश्न आणि मागण्या मांडल्या. तळेगाव, नवलाख उंब्रे एमआयडीसीतील वाढती वाहतूक पाहता या एमआयडीसी परिसरात ट्रक टर्मिनल उभारणे गरजेचे आहे.

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र वाढत असताना कुशल कामगार स्थानिक युवकांमधुन निर्माण व्हावेत, यासाठी कौशल्य विकासावर आधारित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांची गरज आहे.

लोणावळा येथे एकच औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून भौगोलिक परिस्थितीनुसार मध्यवर्ती ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारणे गरजेचे आहे. तरुणांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

नव्या सरकारकडून औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यानुसार प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, असे अनेक प्रश्न आमदार शेळके यांनी मांडले.

तसेच या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी अशी विनंतीही आमदार शेळके यांनी केली.

भविष्यकाळात मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल व स्थानिक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

spot_img
Latest news
Related news