Pimpri News : शहरातील 3773 खड्ड्यांपैकी 3382 खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा; शहरात अद्यापही 400 खड्डे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवर 3 हजार 773 खड्डे असून त्यापैकी 3 हजार 382 खड्डे बुजविले आहेत.सुमारे 90 टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले.नागरिकांच्या तक्रारींची गंभीरतेने दखल घेऊन उर्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.दरम्यान, शहरात आणखी 391 खड्डे आहेत.

नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याबाबत महापालिकेच्यावतीने दक्षता घेण्यात येते.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांबाबत असणारी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.आवश्यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्सने खड्डे भरले आहेत.इतर ठिकाणी मुरूम,खडी तसेच काँक्रिटने करून खड्डे बुजविण्याचे काम देखील करण्यात आले आहे.परंतु, पावसामुळे काही ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिका यंत्रणेचे ते खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे.

काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले असल्याचे तसेच गणेश विसर्जनासाठी खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.अशा परिस्थितीत संबंधित विभागाने रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच ज्या भागात पाणी साचते तेथे वेळेत उपाययोजना कराव्यात, याबाबतचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. महापालिका यंत्रणेचे खड्डे बुजवण्याचे काम निरंतर सुरु असून खड्ड्यांसंदर्भात नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा तातडीने केला जात असल्याची माहिती संबंधित आधिका-यांनी दिली.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 289 खड्डे होते. त्यापैकी 239 भरले. ‘ब’ मधील291 पैकी 275 खड्डे बुजविले, ‘क’ मधील 854 पैकी 719 खड्डे बुजविले, ‘ड’ मधील 739 पैकी 698 खड्डे बुजविले, ‘इ’ मधील 380 पैकी 353 खड्डे बुजविले, ‘फ’ मधील 655 पैकी 583 खड्डे बुजविले, ‘ग’ मधील 363 पैकी 342 खड्डे बुजविले आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय मधील 199 पैकी 173 खड्डे असे एकूण 3 हजार 773 पैकी 3 हजार 382 खड्डे बुजविल्याचा दावा पालिकेने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.