Pimpri News : मेट्रो प्रकल्पाबाबत महापालिका उदासीन

अर्थसंकल्पात मेट्रोसाठी शून्य तरतूद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो प्रकल्पाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कारण, महापालिकेच्या 2021-22 या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी एक रुपयांचीही तरतूद केली नाही. एकीकडे अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेवर मेट्रोला ठळक स्थान दिले आहे. पण, अर्थसंकल्पात मेट्रोचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवड मदर टेरेसा उड्डाणपुल असे 7.50 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकार आणि  महापालिकेच्या निधीतून महामेट्रोकडून हे काम केले जात आहे. तसेच, नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)  बनविण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतच्या 4.41 किलोमीटर अंतराच्या वाढीव खर्चास राज्य सरकारने बुधवारी (दि. 17) मान्यता दिली आहे. त्याच्या दुस-या दिवशी सादर झालेल्या महापालिकेच्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी एक रुपयांचीही तरतूद केली नाही.

विरोधाभास म्हणजे अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेवर मेट्रोला ठळक स्थान देण्यात आले आहे. पण, तरतूद शून्य ठेवल्याने  आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे. मागीलवर्षी अर्थसंकल्पात मेट्रोसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

याबाबत विचारले असता आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”अर्थसंकल्पात मेट्रोसाठी निधीची तरतूद केलेली नाही. गरज पडल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.