Pimpri : नेहरूनगरमध्ये तरुणावर खुनी हल्ला; 100 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत 100 जणांनी एकावर खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेनऊ वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

आशिष जगधने (वय 31), इरफान शेख (वय 30), जितेश मुंजळे (वय 28), जावेद औटी (वय 29), आकाश हजारे (वय 30) आणि अन्य 95 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता निलेश जाधव त्यांच्या ऑफिससमोर पार्क केलेल्या कारमध्ये लॅपटॉप ठेवत होते. त्यावेळी सर्व आरोपी तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटा घेऊन कार, दुचाकी वाहनांवरून डबल, ट्रिपलसीट आले.

एकाने निलेश जाधव यांच्याकडे बोट दाखवून ‘हा होता का’ अशी विचारणा केली. ‘याला आपण जिवंत सोडायचे नाही. याला संपवून टाकू’ असर म्हणत एकाने तलवारीने निलेश यांच्यावर वार केले. त्यानंतर आरोपींनी निलेश यांना पळवून मारहाण केली. ‘कोणाच्यात दम असेल तर बाहेर या’ असे म्हणत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. तसेच काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.

घटनास्थळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त, गुन्हे शाखा आणि पिंपरी विभागाचे सहाय्यक आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.