National Political Party News : राष्ट्रवादीसह तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढला; ‘आप’ला मिळाली बढती

एमपीसी न्यूज – दरवेळी लोकसभा निवडणुकानंतर निवडणूक (National Political Party News) आयोगाकडून पक्षांच्या दर्जाबाबत समीक्षा केली जाते. मात्र सन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीनंतर ही समीक्षा करण्यात आली नव्हती. यावर्षी 21 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षांची सुनावणी घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. तर आम आदमी पक्षाचा दर्जा वाढून तो आता राष्ट्रीय पक्ष झाला.

निवडणूक आयोगाने मार्च महिन्यात भाजप, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष या पक्षांच्या दर्जाबाबत आढावा घेतला. दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात राज्यात आपला मिळालेल्या यशामुळे तो पक्ष राष्ट्रीय पक्ष होऊ शकला आहे.

राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला.

देशात सहा पक्ष आहेत ‘राष्ट्रीय’ – National Political Party News

भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पार्टी हे सहा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष आहेत.

या पक्षांचाही दर्जा काढला –

राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीडीए (मणिपूर), पीएमके (पुदुच्चेरी), राष्ट्रीय समाज पक्ष (पश्चिम बंगाल), एमपीसी (मिझोराम) या पक्षांचा राज्यस्तरीय दर्जा काढून घेण्यात आला आहे.

‘राष्ट्रवादी’बाबत –

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना सन 1999 मध्ये झाली. अवघ्या एक वर्षात सन 2000 साली हा पक्ष राष्ट्रीय पक्ष बनला. राष्ट्रवादीला सन 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रीय दर्जा राखण्याइतपत पुरेशी मते मिळाली. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 खासदार निवडून आले होते.

सन 2014 पासून राष्ट्रवादीला पक्षाच्या दर्जाबाबतचे निकष पूर्ण करता आले नाहीत. गोवा, मणिपूर आणि मेघालय राज्यात राष्ट्रवादीला पुरेशी मते मिळाली नाहीत. दर्जा रद्द झाला तरी त्याचा राज्यातील (National Political Party News) संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही.

राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे घड्याळ हे चिन्ह पक्षाला महाराष्ट्रात आणि नागालँडमध्ये वापरता येईल. अन्य राज्यात घड्याळ हे चिन्ह अन्य पक्षाला मिळू शकते.

‘आप’बाबत –

आम आदमी पक्षाची स्थापना सन 2012 मध्ये झाली. आप पक्षाची दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्ता आहे. गुजरात विधानसभेत आपचे पाच तर गोवा विधानसभेत दोन आमदार आहेत.

अवघ्या 11 वर्षात पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. गुजरात निवडणुकीनंतर आप हा राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पात्र झाला. मात्र निवडणूक आयोगाकडून घोषणा होत नसल्याने आपचे कर्नाटकचे संयोजक पृथ्वी रेड्डी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आप राष्ट्रीय पक्ष होईल किंवा नाही, याबाबत 13 एप्रिल पर्यंत निर्णय देण्याबाबत निवडणूक आयोगाला सांगितले होते.

‘तृणमूल कॉंग्रेस’ आणि ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’बाबत –

तृणमूल कॉंग्रेसला सन 2016 मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र गोवा आणि पूर्वोत्तर राज्यातील पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीमुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सन 1925 मध्ये झाली.

सन 1989 मध्ये पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली. पश्चिम बंगाल आणि ओडिशा निवडणुकीत अल्प मते मिळाल्याने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढण्यात आला.

राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाचे निकष

  • किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असणे आवश्यक.
  • किमान तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय मिळवणे आवश्यक
  • लोकसभेमध्ये किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते किंवा चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते असणे आवश्यक
  • यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा दिला जातो.

 

राजकीय पक्षांच्या प्रादेशिक दर्जाचे निकष –

  •  विधानसभा निवडणुकीत वैध मतांपैकी किमान सहा टक्के मते आणि एकूण जागांपैकी किमान दोन जागा मिळणे आवश्यक.
  •  लोकसभा निवडणुकीत वैध मतांपैकी किमान सहा टक्के मते आणि एकूण जागांपैकी किमान एक जागा मिळणे आवश्यक.
  •  विधानसभा निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान तीन टक्के जागा किंवा किमान तीन जागा, यापैकी जे मोठे असेल ते मिळणे आवश्यक.
  • लोकसभा निवडणुकीत राज्यातील 25 जागांमध्ये एक जागा मिळणे आवश्यक.
  •  विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत वैध मतांपैकी किमान आठ टक्के मते मिळायला हवी.

दर्जा मिळाल्याचे फायदे –

  • निवडणूक चिन्ह राखीव राहते. प्रादेशिक पक्ष असेल तर प्रादेशिक स्तरावर पक्षाचे चिन्ह राखीव राहते. तर राष्ट्रीय पक्ष असेल तर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे चिन्ह राखीव राहते.
  • पक्षाच्या कार्यालयासाठी जागांच्या दरांमध्ये अनुदान मिळते.
  • दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपण केले जाते.
  •  निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचे मोफत वितरण केले जाते.
  • निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेद्वारासोबत एक प्रस्तावक असेल तरीही चालू शकते.
  •  निवडणुकीत 40 स्टार प्रचारकांना पक्ष उतरवू शकतो. स्टार प्रचारकांकडून केला जाणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही.

राष्ट्रीय पक्ष नसेल तर –

  • ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरवर सुरुवातीला पक्षाचे चिन्ह दिसत नाही.
  • निवडणूक आयोगाकडून बोलावल्या जाणाऱ्या बैठकीला राष्ट्रीय पक्ष नसलेल्या पक्षांना बोलावण्याचे बंधन नाही.
  • राजकीय फंडिंगवर परिणाम होऊ शकतो.
  • स्टार प्रचारकांची संख्या 40 वरून 20 होते.
  •  इतर राज्यात निवडणूक लढताना वेगळे चिन्ह घ्यावे लागेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.