Talegaon : आता रडायचं नाय, आता लढायचं’ म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी केला भाजपा विरोधात एल्गार    

एमपीसी न्यूज – ‘आता ठरलंय…आता रडायचं नाय, आता लढायचं,’ असे म्हणत मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी आज भाजपाच्या विरोधात एल्गार केला.  

भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेल्या सुनील शेळके यांना नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारत  असल्याचे शेळके यांनी जाहीर केले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष करीत निर्णयाचे स्वागत केले.

त्यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तळेगाव नगरपरिषद विरोधी पक्षनेते गणेश खांडगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे, सुरेश चौधरी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस संतोष भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, शिवसेना नेते अनिकेत घुले यांच्यासह राष्ट्रवादी व सुनील शेळके समर्थक उपस्थित होते.

यावेळी शेळके यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना शेळके भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, ‘आता ठरवलंय, आता रडायचं नाही, आता लढायचं, आता लढायचं आपल्या हक्कासाठी! ज्या परिवारातील मंडळींनी आपल्याला घराबाहेर काढलं,  चार पिढ्या पक्षाचं काम करणाऱ्या पठ्ठ्याला बाहेर काढलं, त्यांना विधानसभेतून बाहेर काढण्यासाठी लढायचं आहे’.

ही निवडणूक माझी नाही तर मावळ तालुक्यातील जनतेची आहे. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रतिष्ठा व सन्मानाची आहे. ही निवडणूक माझ्या प्रत्येक मायबाप मंडळींना हक्क मिळवून देण्याची आहे, असे सुनीलअण्णा म्हणाले.

या ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील माऊलीभाऊ दाभाडे, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, सुरेशभाऊ चौधरी तसेच सर्व पक्षांची नेते मंडळी आली आहेत. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्यामध्ये मला सामावून घेतलेत, जर माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांकडून काही चूक झाली तर त्यांना माफ करा, ती खूप जीवाभावाची आहेत. आजपासून ज्या पक्षात गेलो त्या पक्षाशी प्रामाणिक राहून प्रयत्न करीन, परिश्रम करीन, प्रत्येकाला न्याय देईन, अशी ग्वाही सुनीलआण्णा यांनी दिली.

खूप सहन केलंय गेल्या तीन वर्षात! भारतीय जनता पार्टीच्या काही स्वार्थी नेत्यांनी खूप त्रास दिला, अपमान केला, तरी सुद्धा अपमान सहन करून त्यांच्या बरोबर राहिलो. स्टेजवर मागे बसवायचे, नाव घ्यायचे नाही, यापासून राजकारण केलं तरी देखील मी त्याचा विचार केला नाही. माझ्या लोकांना, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. माझ्याबरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना साधं पदही दिलं नाही तरी देखील आम्ही सहन करत राहिलो. उमेदवारी द्या म्हणून दारात गेलो, स्वाभिमानाने मी जात होतो, कोणा पुढे झुकलो नाही. कामाची पावती द्या म्हणून सांगायला गेलो होतो. कामाच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर मी उमेदवारी मागत होतो तरी माझी उमेदवारी डावलली. माझं काय चुकलं ते सांगावं मी आजही माफी मागायला तयार आहे, मला का डावाललं ते सांगावं. मला का डावलल, काय-काय बोलून डावललं याचं पोलखोल मी उद्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर करून दाखवणार आहे, असेही ते म्हणाले.

तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात, आपल्याला मावळ तालुक्याचा विकास करायचा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब तसेच अजित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील या सर्व नेत्यांचे आभार मानतो, असे म्हणत यांनी भाषणाचा समारोप केला.

त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी सुनीलआण्णा तसेच बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. सुनीलआण्णांच्या नावाने जयघोष करीत पुष्पवृष्टी केली. फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर सुनीलआण्णा नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी पुण्याला रवाना झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.