Pimpri News: महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ‘श्रीकृपा’वर फौजदारी गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे. साक्षात धनलक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या या शहरविकासाच्या मंदिरास भाजपामुळे भ्रष्टाचाराची वाळवी लागली. बोगस, खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून पालिका आयुक्तांनाच ‘टिकली’ मारून जाणाऱ्या बोगस ठेकेदारांकडे, भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे कानाडोळा का केला जातोय. बोगस, खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

पालिकेत लूटणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी फौजदारी कारवाई करावी अशी मागणी माजी महापौर योगेश बहल यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

बहल म्हणाले, ”पालिकेचे सर्वात जबाबदार घटक असणाऱ्या आयुक्तांचा कसलाही धाक अधिकारी, पदाधिकारी यांना राहिला नाही. म्हणूनच आयुक्त राजेश पाटील यांच्या नाकाखाली बिनधास्त पालिकेची लुट सुरू आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली होती.

या निविदेमध्ये चार कंत्राटदार सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रिन्सिपल सिक्युरिटी ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस प्रा.लि., बीव्हिजी इंडिया लिमिटेड, रुबी अलकेअर सर्व्हिसेस प्रा.लि. आणि श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये तांत्रिक मुल्यमापनाचे गुण आणि निविदेतील दर समान आल्यामुळे बीव्हिजी इंडिया लिमिटेड, रुबी अलकेअर सर्व्हिसेस प्रा.लि. आणि श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या तीन ठेकेदारांना काम विभागून देण्यात आले आहे”.

तर, प्रिन्सिपल सिक्युरिटी ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस प्रा.लि. यांना तांत्रिक मुल्यमापनामध्ये गुण कमी आल्याने पात्र ठरल्यानंतरही काम देण्यात आले नाही. तांत्रिक मुल्यमापन हे दराचे दुसरे पाकिट उघडण्यापूर्वी होणे अपेक्षित असताना केवळ प्रिन्सिपल सिक्युरिटी ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस यांना अपात्र करण्यासाठी तांत्रिक मुल्यमापन करण्यात आले आहे.

या संस्थेकडे एम्स, रिलायन्स, टाटा, रेल्वेसारख्या रुग्णालयांना मनुष्यबळ पुरविल्याचा अनुभव असताना व रद्द केलेल्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुल्यमापनामध्ये रुबीपेक्षाही अधिक गुण असताना दुसऱ्यावेळी झालेल्या निविदा प्रक्रियेत केवळ या संस्थेला दूर ठेवण्याच्या दृष्ट हेतूने कमी गुण देण्यात आल्याचा बहल म्हणाले.

”या निविदेमध्ये पात्र ठरलेल्या आणि तांत्रिक मुल्यांकनामध्ये शंभर गुण (?) प्राप्त करणाऱ्या श्रीकृपा सर्व्हिसेस या कंपनीला निविदा प्रक्रियेत सादर केलेल्या अनुभवाच्या अटीचा कोणताही अनुभव नसताना त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारावर पात्र ठरविण्यात आले आहे. हा सर्व प्रकार महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांनी केलेला आहे. एका अर्थी आयुक्तांनीही या प्रकाराला साथ देत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या ठेकेदारास काम दिलेले आहे”, असा आरोप बहल यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.