New Delhi: दिलासादायक! भारतात कोरोना बळींचे प्रमाण जागतिक प्रमाणाच्या निम्म्याहून कमी

कोरोना बळींचे जागतिक प्रमाण 6.98 टक्के तर भारतात तेच प्रमाण 3.2 टक्के

एमपीसी न्यूज – भारतात आज 1,270 नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी देशात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, ही आशादायक बाब मानली जात आहे. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण एका दिवसात 17.5 टक्क्यांवरून वरून 19.4 टक्के झाले आहे. म्हणजेच दिवसांत हे प्रमाण जवळजवळ दोन टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाबाधित मृतांचे प्रमाणही स्थिर आहे, हे प्रमाण जागतिक प्रमाणाच्या निम्म्याहून कमी आहे, ही भारताच्या दृष्टीने एक जमेची बाजू समजली जात आहे. 

भारतात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जगाच्या तुलनेत कमी आहे. जगात कोरोनामुक्तांची टक्केवारी ही 27.3 इतकी झाली आहे. जगात 25 लाख 88 हजार 864 कोरोनाबाधितांपैकी 7 लाख 06 हजार 817 जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. भारतात 20 हजार 417 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 3 हजार 959 जण बरे झाले आहेत. ही टक्केवारी 19.4 टक्के आहे. कोरोनामुक्तांची संख्याही भारतात दिवसेंदिवस वाढत आहे.

जगात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही जास्त आहे तशीच कोरोनाबाधित मृतांची टक्केवारी देखील जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 417 झाली आहे. त्यापैकी 652 जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 3.2 टक्के आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण 6.98 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. भारतातील कोरोनाबाधित मृतांची टक्केवारी निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. जगात 25 लाख 88 हजार 864 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 1 लाख 81 हजार 083 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगातील 31.67 टक्के कोरोनाबाधित एकट्या अमेरिकेत आहेत. जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी केवळ 0.79 टक्के कोरोनाचे रुग्ण भारतात आहेत. भारतात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर कदाचित हे चित्र बदलेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत 4 लाख 62 हजार 621 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्टचे प्रमाण हे 4.4 टक्के असल्याचे दिसून येत आहे.  अमेरिकेत हेच प्रमाण 19.55 टक्के इतके जास्त आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.