MPC News Event : भारताच्या उज्ज्वल ऐतिहासिक वारशांची नवीन पिढीला ओळख होणे गरजेचे – नितीन चंद्रकांत देसाई

एमपीसी न्यूज – भारताला उज्ज्वल ऐतिहासिक वारसा आहे. हा ऐतिहासिक वारसा लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. पण, इतिहास लोकांसमोर मांडण्याऐवजी नको ते विषय मांडले जातात. उज्ज्वल इतिहास लोकांसमोर आणण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. इतिहासाला रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडणार आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचा माझा ध्यास आहे. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारतीय कला, संस्कृतीचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी दिली.

एमपीसी न्यूज ‘कला संवाद’ आयोजित ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या दृकश्राव्य व प्रकट मुलाखतींच्या कार्यक्रमात ऐतिहासिक चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांची निर्मितीबाबत देसाई बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  शनिवारी झालेल्या कार्यक्रमात नामवंत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी देसाई, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, अभिनेते राहुल सोलापूरकर यांना बोलते केले. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्यापासून आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक चित्रपट, नाटके व दूरचित्रवाणी मालिकांच्या प्रवासाचा चित्रफितींच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत उपस्थित रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

 

Environmental Awareness : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचे धडे द्यावेत – आयुक्त पाटील

 

श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, एसएआर इंडस्ट्रीजचे संचालक अतुल इनामदार, पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे रजिस्ट्रार योगेश भावसार, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे,  रागा हॉटेलचे संचालक, माजी नगरसेवक अमित गावडे, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे अकाउंट डायरेक्टर  महेश बोर्डे, चित्रपट निर्माते  राजेंद्र शिंदे, एमपीसी न्यूजचे मुख्य संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर, फिचर्स व आर अँड डी विभागाचे संपादक राजन वडके, पिंपरी महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) व एसएआर इंडस्ट्रीज हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व इंद्रायणी इंडस्ट्रियल इस्टेट हे सहयोगी प्रायोजक होते. एबीपी माझा वृत्तवाहिनीने टेलिव्हिजन पार्टनर तर हॉटेल ‘रागा थाळी’ने हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून जबाबदारी पार पाडली.

”गेले तीन महिने मी स्टुडिओत काम करत आहे. कुठेच बाहेर पडलो नाही. पण, एमपीसी न्यूज ‘कला संवाद’ आयोजित ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हा कार्यक्रम भावला म्हणून मी आलो” असे सांगत कलादिग्दर्शक नितीन देसाई म्हणाले, ”ऐतिहासिक वारसा पुढे जायला पाहिजे. तो सर्वांनी पुढे नेला पाहिजे. हा कार्यक्रम त्याला पूरक आहे. मी वडिलांसोबत राजर्षी शाहू महाराजांची पुस्तके वाचत होतो. इतिहासाचा अभ्यासक होतो. पण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्यासाठी मी कलादिग्दर्शनाकडे वळलो. माझ्या स्टुडिओत पहिल्यांदा राजा शिवछत्रपती मालिकेची निर्मिती झाली. महाराजांच्या मालिकेत कुठेही तडजोड केली नाही. त्यात बजेटचा विचार केला नाही. ‘भारत एक खोज’ या मालिकेतून माझी जडण-घडण झाली”.

 

…म्हणून चित्रपटातही काम केले

”मला भारतीय संस्कृती, इतिहासाचे वेड लागले आहे.  देश, महाराष्ट्रातील थोर पुरुषांच्या कथा इतिहासाला जिवंत करत लोकांसमोर मांडणार आहे. मी कामासाठी काम करतो. पैशांसाठी काम करत नाही. लोक जोडत जातो. दिग्दर्शकाने कलाकारांचे मन, भावना समजून घेतली पाहिजे. कलाकारांना दिग्दर्शकाकडून काय अपेक्षित असते. त्यासाठी मी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘हॅलो, जय हिंद’ या चित्रपटात 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबळे यांची व्यक्तिरेखा साकारली. अकबराला महाराणा प्रताप यांनी झुंज दिली. ते नव्या पिढीसमोर आले पाहिजे. त्यासाठी महाराणा प्रताप यांच्यावर वेब सिरीज करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

 

कलाकाराला दोन जगणे अनुभवयाला मिळते – अविनाश नारकर

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा ऐतिहासिक नाटकांकडे खेचून आणणारे ताकदीचे अभिनेते अविनाश नारकर म्हणाले, ”अभिनय क्षेत्रात येण्यासाठी बलराज साहनी यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळाली. शब्दोचार हा अभिनयाचा पाया आहे. कलाकाराला पात्रामध्ये पूर्ण झोकून द्यावे लागते. मी व्यक्तिरेखेच्या बह्यांगाचा विचार करतो. देहबोली ठरवून घेतो. जनमानसात जाऊन वावरतो. अंतरंग शोधण्याचा प्रयत्न करतो. मुलभूत गोष्टी लक्षात ठेवून सहजतेने अभिनय केल्यास लोकांना भावतो. रंगमंचावर शब्दोचार, आवाजावर मेहनत करावी लागते”.

”मालिकेत काम करताना अभिनयात धक्कातंत्र आणावे लागते. चित्रपटात अगदी सहजतेने भावना व्यक्त करता आली पाहिजे. मनुष्यप्राण्याचा गाभा ही सात्विकता आहे. मी व्यक्तिरेखेतील सात्विकता शोधण्याचा प्रयत्न करतो. लेखक विश्वास पाटील यांनी रणांगण नाटक 11 वेळा परत-परत लिहिले. 14 ते 16 तास सलग 30 दिवस तालीम केली होती. दररोज 1 तास तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते. प्रत्येकजण आपले जीवन जगत असतो. कलाकारही आपल जीवन जगतो. पण, कलाकाराला आणखी एक जगणे अनुभवयाला मिळते ते म्हणजे व्यक्तिरेखेचे, त्यामुळे कलाकार भाग्यवान आहे. व्यक्तिरेखेचे जीवन अनुभवासहित जगता येते. सुविचार फळ्यावर न राहता आचारणात आला पाहिजे. त्यानंतर जगणे सुविचार झाले पाहिजे. वाईट गोष्टींचा नयनाट करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्राप्रती निष्ठा ठेवली पाहिजे”, असेही नारकर म्हणाले.

इतिहास हा आमचा प्राण – राहुल सोलापूरकर

छत्रपती शाहू महाराजांची भूमिका समर्थपणे सादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले, ”इतिहास हा आमचा प्राण आहे. वारसा पुढे नेणे ही सोपी गोष्ट नाही. इतिहास रंजक करुन मांडावा. पण, स्वत:चा इतिहास कोणी मांडू नये. वारसा खरच पुढे न्यायचा असेल. तर, अगोदर त्याचा अभ्यास केला पाहिजे. जाणीवपूर्वक तो जपला पाहिजे. आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात काम करणे आव्हान वाटले नाही. परंतु, शाहू महाराजांची भूमिका करताना दडपण होते. भूमिकेसाठी 40 किलो वजन वाढविले होते. चित्रपटात कुठेही डमी न वापरता अस्वल, वाघासोबत मी फाईट केली”.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमपीसीचे संपादक विवेक इनामदार यांनी केले. तर, सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रँड मॅनेजर अमोल गाडगीळ, सहसंपादक स्मिता जोशी, मुख्य वार्ताहर गणेश यादव, वार्ताहर सिद्धार्थ गायकवाड, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे तसेच आकांक्षा इनामदार, अनुष्का तपशाळकर, सोनाली चव्हाण, समीर पाटील आणि रंगरेज ग्रुपने विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.