New York: अमेरिकेत मृत्यूचे थैमान, एका दिवसात कोरोनाचे 2,407 बळी

एमपीसी न्यूज – जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः मृत्यूचे तांडव चालवले आहे. अमरिकेत दिवसातील बळींचा आकडा कमी होऊ लागला असतानाच काल अचानक त्यात मोठी वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे. काल (शुक्रवारी) एका दिवसात कोरोनाबाधित 2 हजार 407 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. हा आतापर्यंतचा एका दिवसातील कोरोना बळींचा विक्रम मानला जातो. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 26 हजार 047 इतका झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

अमेरिकेत गेल्या गुरुवारी एका दिवसात 1,900 बळी गेले होते. त्यात शुक्रवारी वाढ होऊन एका दिवसात 2,035 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर एका दिवसातील मृतांची संख्या कमी होऊ लागली होती. काल (मंगळवारी) 1,528 पर्यंत खाली आला होता. एक आशादायक चित्र दिसू लागले असतानाच पुन्हा मृतांच्या आकड्याने उसळी मारत उच्चांक गाठल्याने अमेरिका काहीशी हताश झाल्यासारखी वाटत आहे.

जगातील कोरोनाबाधितांपैकी 30.71 म्हणजे जवळजवळ 31 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 14 हजार211 असून आतापर्यंत 26 हजार 047 जणांचा मृत्यू झाला असून 38 हजार 820 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 5 लाख 49 हजार 327 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 13 हजार 473 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत मंगळवारी मृतांचा आकडा अडीच हजारांच्या जवळपास पोहचल्याने अमेरिकेत सर्वांची झोप उडाली आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 2 लाख 03 हजार 123 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 10 हजार 834 पर्यंत वाढला आहे. काल (मंगळवारी) न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात 778 कोरोना बळी गेेले आहेत. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 68 हजार 824 झाली असून बळींची संख्या 4 हजार 240 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगनमध्ये मृतांचा आकडा 1,768 इतका झाला आहे. ल्युसियानामध्ये मृतांच्या आकड्याने हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्या भागात आतापर्यंत 1 हजार 013 बळी गेल्याची नोंद आहे. कॅलिफोर्निया, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरीे प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मृत्यूंचे थैमान – 6,981 बळी! मंगळवारी एका दिवसांत गेलेले कोरोना बळी!

अमेरिका – 2 हजार 407

यू. के. – 778

फ्रान्स – 762

इटली – 602

स्पेन – 499

जर्मनी – 301

बेल्जियम – 254

ब्राझील – 204

कॅनडा – 123

नेदरलँड – 122

स्वीडन – 114

टर्की – 107

इराण – 98

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.