Nigdi : अंगावर गाडी घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; नाकाबंदी दरम्यान घडली धक्‍कादायक घटना

एमपीसी न्यूज – निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी (दि. 16) निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

अनिल नामदेव चव्हाण (वय 40, रा. संस्कृती हाईटस्‌, शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय विष्णू जाधव (वय 54) असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे निगडी वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते निगडीतील टिळक चौकात नाकाबंदी करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपी चव्हाण याच्या एमएच-14-जीवाय-1719 या मोटारीस पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपी चव्हाण याने मोटारीची गती कमी केली नाही. त्याला थांबण्याचा इशारा करण्यासाठी जाधव हे पुढे आले असता चव्हाण याने त्यांच्या अंगावर मोटार घातली. मोटारीसह त्यांना फरफटत नेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पोलीस अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आरोपी चव्हाण याची मग्रुरी थांबली नाही. ‘मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझीच गाडी का अडविली? तुम्ही आमच्यावर दादागिरी करताय, तुमची गुंडशाही चालली आहे. मी लगेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलवितो. मग, तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देत पुन्हा तो पोलिसांच्या अंगावर धावून आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.