Nigdi Crime News : सैन्यात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज – मुलगा सैन्यात भरती झाल्यानंतर चार लाख रुपये द्या, असे  सांगून व्यक्तीकडून मुलाची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी निगडी येथे घडला. या प्रकरणी काल (मंगळवारी) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रवीण जगन्नाथ पाटील (रा. अजनी, जि. सांगली), महेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संभाजी शिवाजी विरकर (वय 40, रा. महादेव नगर, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी 9 नोव्हेंबर रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रोहित वीरकर हा सैन्य भरतीची तयारी करत आहे. 13 फेब्रुवारी 2021 रोजी मराठा इन्फन्ट्री बेळगाव येथे सैन्य भरती झाली. फिर्यादी त्यांच्या मुलाला घेऊन भरतीला गेले.

रोहित याने मैदानी परीक्षेत यश मिळवले. त्यामुळे 23 मार्च रोजी झालेल्या लेखी परीक्षेला त्याला बोलावण्यात आले. रोहित लेखी परीक्षा देण्यासाठी बेळगाव येथील केंद्रावर गेला असताना फिर्यादी केंद्राच्या बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपी प्रवीण पाटील फिर्यादी यांच्याजवळ आला.

तो कमांड हॉस्पिटल वानवडी पुणे येथे नोकरीस असल्याचे त्याने फिर्यादी यांना सांगितले.माझ्या सैन्य दलात ओळखी आहेत. तुमच्या मुलाला सैन्यात भरती करतो. तुम्ही मला चार लाख रुपये द्या. हे पैसे फिर्यादी यांचा मुलगा सैन्यात भरती झाल्यानंतर देण्याचे आरोपी प्रवीण पाटील याने सांगितले.

दरम्यान त्याने फिर्यादी यांच्याकडे त्यांच्या मुलाची मूळ कागदपत्रे मागितली. ती कागदपत्रे आरोपीने त्याचा साथीदार महेश याच्याद्वारे निगडी येथे स्वीकारली. त्यामध्ये फिर्यादी यांनी दहावी, बारावीचे मार्कलिस्ट, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाइल, बोनाफाईड अशी कागदपत्रे होती.

17 एप्रिल रोजी सैन्य भरतीचा निकाल लागला. मात्र फिर्यादी यांच्या मुलाचे त्यात नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी आरोपी प्रवीण पाटील याच्याकडे विचारणा केली असता त्याने कागदपत्रे परत देण्याचे सांगितले. मात्र कागदपत्रे अद्यापपर्यंत परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.