Nigdi News: केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने केली ‘त्या’ वृद्ध महिलेच्या घरी चोरी; दोघांना अटक

फिर्यादी महिलेच्या घरी दोन महिन्यांपूर्वी केअर टेकर म्हणून दिपक सुगावे हा व्यक्ती काम करीत होता. त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आणि त्यादृष्टीने पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवली.

एमपीसी न्यूज – दोन महिन्यांपूर्वी वृद्ध महिलेच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने त्याच्या साथीदारासोबत मिळून वृद्ध महिलेला मारहाण करून 4 लाख 30 हजारांची चोरी केली. ही घटना निगडी प्राधिकरण येथे 10 ऑगस्ट रोजी रात्री घडली. यातील दोन्ही आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

दिपक उर्फ दिष्या अंकुश सुगावे (वय 20, सध्या रा. कल्पना सोसायटी वराळे फाटा, तळेगाव दाभाडे. मूळ रा. मु.पो. सुगा ता. देगलुर. जि. नांदेड), संदीप उर्फ गुरू भगवान हांडे (वय 24, सध्या रा. मोरया गोसावी मंदिरापुढे देशमुखवाडा चिंचवडगाव, मूळ रा. मु. टेम्बापुरी, पो. वाळूज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेमलता मलगौडा पाटील (वय 76, रा. गायत्री हेरिटेज, सेक्टर नंबर 24, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमलता यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. मुलीच्या लग्नानंतर हेमलता त्यांच्या घरात एकट्याच राहत होत्या.

दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हेमलता टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे हेमलता यांच्या यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी हेमलता यांच्या हातावर छडीने मारून जखमी केले.

त्यानंतर चोरट्यांनी हेमलता यांच्या अंगावरील दागिने, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान चोरट्यांनी हेमलता यांचे हात आणि तोंड टॉवेलने बांधून त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले.

याबाबत 11 ऑगस्ट रोजी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी निगडी पोलिसांनी तीन पथके तयार केली. एक पथक तांत्रिक मुद्यावर तपास करत होते. दुसरे पथक माहीतगार व सराईत गुन्हेगारांना तपासत होते. तर तिस-या पथकाने फिर्यादी वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्यास सुरवात केली.

पोलिसांच्या तपासात माहिती मिळाली की, फिर्यादी महिलेच्या घरी दोन महिन्यांपूर्वी केअर टेकर म्हणून दिपक सुगावे हा व्यक्ती काम करीत होता. त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आणि त्यादृष्टीने पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवली.

दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस नाईक सतीश ढोले यांना माहिती मिळाली की, दिपक सुगावे यानेच त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केला आहे. तो चोरी केलेला माल विकण्यासाठी थरमॅक्स चौक, चिंचवड येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकात सापळा लावला.

थरमॅक्स चौकातील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ दोन व्यक्ती संशयितरित्या थांबलेल्या पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली. सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागल्याने त्यांना विश्वासात घेवून सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी दोघांनी मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले.

त्यांच्याकडे असलेल्या एका बॅगमध्ये चोरी केलेले दोन कॅमेरे आढळून आले. पोलिसांनी कॅमेरे आणि दीपकच्या घरातून चांदीचे साहित्य, घड्याळे, रोख रक्कम असा चोरी केलेला 1 लाख 24 हजारांचा माल जप्त केला. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली 50 हजार रुपये किमतीची दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 17 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पोलीस हवालदार किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, पोलीस नाईक सतीश ढोले, रमेश मावसकर, आत्मलिंग निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय बोडके, दिपक जाधवर, सोपान बोधवड, राजेंद्र जाधव यांच्या पथकाने केली आहे.

केअर टेकर म्हणून कामाला ठेवताना सावधगिरी बाळगा

घरातील वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांच्यासाठी केअर टेकर म्हणून कामाला ठेवताना नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्या व्यक्तीला आपण कामाला ठेवतो आहोत, त्याची सध्या राहण्याचा पत्ता, मूळ पत्ता, मोबाइल क्रमांक, आधारकार्ड, पॅनकार्ड यांची झेरॉक्स प्रत अशी कागदपत्रे घेऊन पोलिसांकडून त्याचे व्हेरिफिकेशन करावे.

संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी राहते तिथली माहिती जे कामाला ठेवत आहेत, त्यांना असायला हवी. पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय असे कामगार कामाला ठेऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.