Nigdi News: पोलिसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्तांचा दरबार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस दरबार घेतला. यामध्ये 54 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेत आपल्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या.

शुक्रवारी (दि. 28) पिंपरी चिंचवड मुख्यालय, निगडी येथे हा दरबार घेण्यात आला. यावेळी पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सतीश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) पद्माकर घनवट, जनसंपर्क अधिकारी / वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (कल्याण शाखा) रावसाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (विशेष शाखा) राजकुमार राजमाने, द इंडियन न्युट्रिशियन कोच या संस्थेच्या आहार तज्ञ सायली भोसले व त्यांची टीम आदी उपस्थित होते.

पोलीस दरबारात प्रामुख्याने पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी त्यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने वैयक्तीक व प्रशासकीय कामकाजाच्या आपल्या समस्या पोलीस आयुक्त यांच्या समक्ष मांडल्या. आयुक्तांनी पोलिसांना येणाऱ्या समस्या व अडी-अडचणी ऐकून घेत संबंधित अधिकारी व प्रशासकीय अधिका-यांना समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आयुक्तांनी मार्गदर्शन केले.

पोलिसांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन शिबीर

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी द इंडियन न्युट्रिशियन कोच या संस्थेमार्फत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असे आजार आहेत, त्यांच्यासाठी आहारतज्ञ सायली भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये आरोग्याच्या विविध समस्या यामध्ये आहार विषयक, मानसिक आरोग्य विषयक योगा व इतर सहज करण्यात येणारे व्यायामाचे प्रकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असे आजार आहेत, त्यांच्यासाठी द इंडियन न्युट्रिशियन कोच या संस्थेमार्फत 12 दिवसांचे शिबीर (दर शनिवारी) पोलीस मुख्यालय येथे राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीसांना आहार विषयक माहिती, तसेच तज्ञ योग प्रशिक्षकांकडून योगा व व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.