Nigdi: स्वयंघोषित भाई आणि त्याच्या पिलावळीचा निगडी प्राधिकरण येथे राडा

एमपीसी न्यूज –  स्वयंघोषित भाई असलेल्या एकाने त्याच्या साथीदारांसोबत(Nigdi) मिळून प्राधिकरण निगडी परिसरात राडा घातला. एका व्यक्तीच्या कारची काच फोडून त्याला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 16) पहाटे म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पिटल चौक दरम्यानच्या रस्त्यावर घडली.
सुजित शामराव जाधव (वय 54, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात(Nigdi) फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारक्या भाई, दुध्या, आदल्या, नन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि चार अनोळखी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे शनिवारी पहाटे चालण्यासाठी बाहेर आले होते. त्यावेळी तिथे आलेल्या एका टोळक्याने रस्त्यावर पडलेला दगड जाधव यांच्या कारवर मारला. त्यामध्ये कारची काच फुटली. त्याबाबत जाधव यांनी जाब विचारला.
या कारणावरून आरोपींनी जाधव यांना पकडून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. मात्र जाधव यांनी ते वार चुकवून तिथून पळ काढला. काही आरोपींनी जाधव यांचा काठ्या घेऊन पाठलाग केला. त्यातील एकाची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अविनाश राजू शिंदे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.