Pune News : लाचप्रकरणी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील सब रजिस्ट्रार महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावावरील जागेच्या कागदपत्रांवर मुलीची हक्कसोड पत्राची रजिस्ट्री करून मुलगा आणि पत्नीच्या नावे बक्षीसपत्राची रजिस्ट्री करण्यासाठी हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालयातील सब रजिस्ट्रारने 30 हजारांची लाच मागितली, शिवाय तडजोडीअंती 10 हजारांची लाच मागितली. याप्रकरणी सब रजिस्ट्रार महिलेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

हवेली क्रमांक आठ, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील सब रजिस्ट्रार लीना संगेवार असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या नावे लोहगाव येथे साडेनऊ गुंठे जागा आहे. या साडेनऊ गुंठ्याच्या प्लॉटच्या कागदपत्रांवर तक्रारदार यांच्या बहिणीची हक्कसोड पत्राची रजिस्ट्री करून ती तक्रारदार आणि त्यांच्या आईच्या नावे बक्षिसपत्राची रजिस्ट्री करायची होती. त्यासाठी सब रजिस्ट्रार आरोपी महिलेने तक्रारदाराकडे सुरुवातीला 30 हजारांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून 10 हजार रुपयांची मागणी केली.

याबाबत एसीबीने 20 सप्टेंबर रोजी सापळा लावून पडताळणी केली होती. याप्रकरणी 17 नोव्हेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.