Pune News : मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम; सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे यांनी मोबाईल ॲप  “SYMBIONLINE” द्वारे ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे, कारण शिक्षणात पहिल्यांदा ऑनलाइन पदवी कार्यक्रम एका विद्यापीठाद्वारे मोबाइल ॲपद्वारे सुरू केले जात आहेत. ही शिक्षणातील क्रांती असल्याची माहिती सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रा-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार यांनी दिली.

स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “रिच द अनरिच्ड” या आमच्या उद्देशसह माफक आणि परवडणाऱ्या शुल्कात ऑनलाइन पदवी कार्यक्रम सुरू करत आहोत. हे ऑनलाइन पदवी कार्यक्रम “SYMBIONLINE” या मोबाईल ॲपद्वारे वितरित केले जातील. अनेक विद्यार्थी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक उपलब्ध होत नाहीत. शिवाय, ग्रामीण आणि गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे संगणक किंवा लॅपटॉप नाहीत. मात्र, आता सर्वांकडे मोबाईल उपलब्ध आहेत. त्यामुळे सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन पदवी कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हे ॲप SYMBIONLINE नावाने प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. सिम्बायोसिसच्या शिक्षकांची लेक्चर्स APP वर उपलब्ध असतील तसेच शिक्षकांच्या नोट्स, चाचण्या आणि वाचन साहित्य APP वर उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त थेट व्याख्याने आणि ही सर्व शैक्षणिक संसाधने वेब साइटवर उपलब्ध असतील.

सिम्बायोसिसकडे ऑनलाईन शिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आम्ही ऑनलाइन आणि मोबाइल ॲपवर शिक्षण देण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान व्यासपीठ तयार केले आहे.

पहिल्या टप्प्यात बीए इंग्रजी, बीए मराठी, बीबीए, बीसीए, बी कॉम, एमबीए (एच आर, फायनान्स, मार्केटिंग, हेल्थकेअर, व्यवस्थापन) हे ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. या ऑनलाइन पदवी कार्यक्रमांसाठी वार्षिक परवडणारी फी आहे, जी एकरकमी अथवा हफ्त्यांमध्ये भरली जाऊ शकते. या पदव्या सरकारच्या 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीद्वारे दिल्या जातील.

सिम्बायोसिसचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, या उपक्रमामुळे उच्च शिक्षणात क्रांती होईल आणि सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. आत्तापर्यंत आपल्या मोठ्या संख्येने तरुणांना या संधीपासून वंचित ठेवण्यात आले होते पण आता सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या मोहिमेवर आहे. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ आहे, ज्याचे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर अत्याधुनिक कॅम्पस आहे. विविध उच्च विकास क्षेत्रांमध्ये कौशल्य आधारित शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

स्किल्स युनिव्हर्सिटी मॉडेल अत्यंत यशस्वी झाले आहे आणि आमच्या अभ्यासक्रमांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ स्वाती मुजुमदार यांनी माहिती दिली की सामाजिक प्रभाव असलेले अनेक अल्पकालीन कौशल्य अभ्यासक्रम आम्ही प्रदान करीत आहोत.

2500 हून अधिक ग्रामीण आणि वंचित मुलींना तसेच कोविड दरम्यान पती गमावलेल्या महिलांना विद्यापीठ कॅम्पसमध्ये उच्च उद्योग आणि PCMC यांच्या सहकार्याने नवीनतम कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने “आत्मनिर्भर आणि कुशल” असे दोन पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे. या बॅचेसमधील काही विद्यार्थ्यांनी या कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते यशस्वी उद्योजक कसे बनले, याचे अनुभवही यावेळी सांगितले.

मोबाईल ॲप SYMBIONLINE चा शुभारंभ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते 17 मार्च 2022 रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.